Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; मोदी सरकारला आवाहन करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:54 AM2022-02-25T10:54:15+5:302022-02-25T10:55:18+5:30
Russia-Ukraine Conflict: काही गोष्टी सांगाव्या लागत नसून, मोदी सरकारने जबाबदारी समजून कृती करावी, असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे.
सातारा: आताच्या घडीला संपूर्ण जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे (Russia-Ukraine Conflict) लागले आहे. हा संघर्ष लवकरात लवकर शमावा, यासाठी अन्य देशांकडून प्रयत्न केले जात आहे. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. रशिया आणि युक्रेन संघर्षावर जगभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यातच भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही यावर आपले मत व्यक्त करताना केंद्रातील मोदी सरकारला एक आवाहन केले आहे.
मीडियाशी बोलताना उदयनराजे यांना रशिया-युक्रेन संघर्ष, मराठा आरक्षण आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाची होत असलेली कारवाई यांसारख्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी रशिया आणि युक्रेन संघर्षातून युद्धापर्यंत गेलेल्या परिस्थितीचा निषेध केला. दोन्ही देशात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे केंद्राची जबाबदारी आहे. युद्धाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत
रशिया आणि युक्रेनमध्ये या संघर्षात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, मी प्रयत्नशील आहेच. पण काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने जे भारतीय दोन्ही देशात अडकले आहेत, त्यांना मायदेशात सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारने जबाबदारी समजून प्रत्येकाला परत आणण्याचे संपूर्ण पणाला लावले पाहिजे, असे उदयनराजे यांनी सांगितले.
लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाला आहे
अनेक गोष्टी उघडपणे बोललो असून, राजकारण म्हणून बोललो नाही. याचा परिमाण मतदार, सर्वसामान्यावंर किती होतो याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाल्याचे चित्र दिसत आहे. लोक जेव्हा पाहतात तेव्हा डोळ्यांमध्ये आत्मियता असायला हवी. पण, ती आता कमी होत चालली आहे, असे स्पष्ट मत उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. हे कर्म आहे, याच जन्मात परतफेड करावी लागते. याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. जर तथ्य नसते तर ते झाले नसते, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी महाविकास आघाडीवर नेत्यांविरोधात होत असलेल्या कारवाईसंदर्भात व्यक्त केली.
दरम्यान, मराठा आरक्षण मुद्द्यावर न बोललेलं बरे. सगळीकडे राजकारण आणणार असाल तर बोलून बोलून तोंडाची चव गेली, अशी नाराजी उदयनराजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.