वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील औद्योगिक ग्रामोद्योग संस्था मर्यादित दहिवडी, या संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत ३० वर्षांची सत्ता राष्ट्रवादीकडून खेचून आणण्यात यश मिळविले. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांचा जयघोष करत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अपघातात जखमी असलेले आमदार जयकुमार गोरे यांना कार्यकर्त्यांकडून विजयाची अनोखी भेट देण्यात आली.खादी ग्रामोद्योग संस्थेसाठी रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत २,५८१ पैकी अवघ्या ६३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी २४.४४ टक्के इतकी राहिली. मतदानानंतर तत्काळ मतमोजणी करण्यात आली. या संस्थेत ११ संचालकांपैकी सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील सात जागांवर भाजपाचे सदाशिव बनगर, अनिल गुंडगे, सुनील चव्हाण, नितीन दोशी, सुभाष खाडे व संजय सोनवणे तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सुजित अवघडे हे उमेदवार सरासरी ५० ते ८० मतांच्या फरकाने निवडून आले.विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील एका जागेवर संतोष विजयराव हिरवे हे बिनविरोध निवडून आले आहेत. इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी आलेला एकमेव अर्ज बाद झाला होता, तर महिला राखीव प्रवर्गातील दोन जागांसाठी नामनिर्देशन अर्ज भरले नसल्याने संचालक पदाच्या तीन जागा रिक्त राहिल्या. या निवडणुकीत भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सिद्धार्थ गुंडगे, सोमनाथ भोसले, हरिभाऊ जगदाळे, राजाभाऊ बोराटे, विलास देशमुख आदी कार्यकर्त्यांचे योगदान यशस्वी ठरले.निकालानंतर विजयी उमेदवारांचे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, दहिवडीच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई गुंडगे, डॉ. संदीप पोळ, अर्जुन काळे, प्रा. सचिन होनमाने, किसन सस्ते यांच्यासह भाजपाच्या कार्यकत्यांनी कौतुक केले.
माणच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत भाजपाची बाजी, ३० वर्षांनी सत्तांतर; आमदार जयकुमार गोरेंचा जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 1:08 PM