कऱ्हाड : ‘कऱ्हाडमध्ये भाजपची खुली अन् छुपी युती आहे. खुली युती कुणाबरोबर आहे हे कऱ्हाडकरांना माहीत आहेच; पण भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी निवडणुकीतून माघार घेऊन काँग्रेस आघाडीशी छुपी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे छुपी युतीही उघड झाली आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी केला. दरम्यान, त्यांनी पावसकर यांना जिल्हाभर फिरायचे अगोदर माहीत नव्हते का? असा सवालही केला.पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर चिन्ह वाटप झाल्यानंतर याची माहिती अन् उमेदवार परिचय करून देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लिना थोरवडे, सौरभ पाटील, सारिका पाटील, सागर बर्गे यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.पाटील म्हणाले, ‘पावसकरांनी एकाच म्हणजे स्वत:च्या घरातील ४ उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातला भावाचा अन् स्वत:चा अर्ज मागे घेतला आहे; पण प्रभाग क्रमांक ६ मध्ये त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. हे आता कऱ्हाडकरांनी ओळखले आहे. जिल्हाभर फिरायचे आहे हे जिल्हाध्यक्षांना अगोदर माहीत नव्हते का? असा सवाल करीत नितीन वास्के यांना भाजपने याच प्रभागातून जाणीवपूर्वक एबी फॉर्म दिला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.प्रभाग क्रमांक ६ मधून अगोदर भाजपच्या महिला उमेदवारांनी माघार घेतल्यानेच काँगे्रस आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्या बिनविरोध येण्यापाठीमागे भाजपचाच हातभार असल्याचे सांगत प्रभाग क्रमांक १ ते ६ मध्ये भाजप सर्व ठिकाणी लढणार असे सांगणाऱ्या जिल्हाध्यक्षांनी प्रभाग क्रमांक ३ मध्ये उमेदवारच का उभे केले नाहीत. हा देखील संशोधनाचा भाग आहे. लोकशाही आघाडीने २२ ठिकाणी नगरसेवकासाठी उमेदवार उभे केले असून, ११ मध्ये रत्ना विभुते या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भाजपची काँगे्रसशी छुपी हात मिळवणी!
By admin | Published: November 13, 2016 12:03 AM