रेठरे बुद्रुक : ‘भाजपाचे सरकार हे सत्तापिपासू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंना निवडणुकीच्या तोंडावर केलेली अटक होय,’ असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँगे्रस व राष्ट्रीय काँगे्रसची संयुक्त प्रचार सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी मुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम साळुंखे होते. यावेळी काँगे्रसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते.धनंजय मुंडे म्हणाले, ‘पंधरा वर्षांच्या नवसान भाजपवाले सत्तेत आले आहेत. उद्या राहतील की नाही हे सांगता येत नाही. परंतु जोपर्यंत केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता आहे. तोपर्यंत जर सत्ताधाऱ्यांनी राजकीय द्वेषापोटी सुडाचे व जातीपातीचे राजकारण करत राहिले तर भविष्यात भाजपचाही रोज एक आमदार जेलमध्ये जाईल. या भागात गलिच्छ राजकारण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणले. पद देतो, पैसा देतो. साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करून भाजप इतर पक्षांतील लोकांना आपल्या पक्षात घेत आहे.भ्रष्टाचार मुक्त देश व काला धन आणणार या मुद्द्यावर नोटाबंदी करून सरकारने ग्रामीण जनतेला वेठीस धरले. कष्टाचे पैसे बँकेतून काढायला दहा-दहा तास बँकेच्या रांगेत उभे केले. हा कष्टाचा अपमानच नाही का? ग्रामीण भागाला कॅशलेसच्या नावाखाली मोदी सरकार पुन्हा बलुतेदार पद्धतीकडे नेत आहे.’सभेच्या सुरुवातीस अजित मोहिते, उत्तमराव मोहिते, जयवंत जगताप आणि अजित पाटील-चिखलीकर यांनी मोहिते-भोसले यांचे जुळणारे आणि तुटणारे मनोमिलन यावर सडेतोड टीका करून तोंडसुख घेतले. (वार्ताहर)रेठरेकरांचा स्वाभिमान कधी जागृत होणार : पृथ्वीराज चव्हाणपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘धनंजय मुंडे आणि मी एका व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक सभा मानावी लागेल. दिवंगत यशवंतराव मोहिते भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला. त्यावेळी मराठी भाषिकांचं राज्य आलं पाहिजे, राज्याची सत्ता ही शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात गेली पाहिजे. ही त्यांची भावना होती. या भावनेतून १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली अन् दिवंगत यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले. त्याच मातीतील आपण सर्वजण आज कोणत्या विचाराच्या मागे जातोय याचा विचार करा, असा चिमटा त्यांनी मदनराव मोहिते यांचे नाव न घेतला काढला.’अविनाश मोहिते यांच्या अटकेविषयी चव्हाण म्हणाले, ‘अन्यायकारक पद्धतीने अविनाश मोहिते यांना तुरुंगात घातले आहे. रेठरेकरांचा स्वाभिमान जागृत कधी होणार यांच्या अटकेचा राग काढण्याची हीच संधी आहे.’
भाजपकडून केवळ सुडाचे राजकारण
By admin | Published: February 17, 2017 10:51 PM