सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचार शेवटच्या टप्प्यात असून, माढा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच पारंपरिक लढत होत आहे. दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांनी निकराने प्रचार सुरू केला आहे, तर या निवडणुकीत ‘वंचित’चा उमेदवार असला तरी साताऱ्याप्रमाणे माढ्यातही मागील निवडणुकीत हा फॅक्टर तेवढा प्रभावी ठरला नव्हता, तरीही ५१ हजार मते घेतली होती. त्यामुळे यावेळी ‘वंचित’ कोणाचे गणित बिघडवणार का? याकडे लक्ष असणार आहे.माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. रविवारी सायंकाळपर्यंत उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अंतिम टप्प्यात प्रचाराचे रान उठवले आहे. अपक्ष उमेदवारही गावोगावी भेटी देऊन मतदारांना साद घालत आहेत. प्रमुख उमेदवारांनी राजकीय नेत्यांच्या सभांतूनही धुरळा उडवलाय. आतापर्यंत मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या सभा झाल्या आहेत, पुढील दोन दिवसांतही सभांनी माढ्याचे रणांगण तापणार आहे. या निवडणुकीत ३२ उमेदवार रिंगणात आहेत. यात वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर, बहुजन समाज पार्टीचे स्वरूपकुमार जानकर हेही नशीब अजमावत आहेत.
मागील २०१९ ची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीतच झाली. त्यावेळी भाजपने मतदारसंघात प्रथमच कमळ फुलविले. त्यावेळी भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ५ लाख ८६ हजार मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना ५ लाखांहून अधिक मते घेता आली. निवडणुकीत शिंदे यांचा ८५ हजार मतांनी पराभव झालेला, तर याच निवडणुकीत वंचितचे ॲड. विजयराव मोरे यांनी ५१ हजार मते घेतली होती. त्यामुळे या मताचा प्रमुख लढतीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले; पण यावेळी वंचितचे उमेदवार बारसकर यांनी पूर्ण तयारी केली आहे, ते किती मते घेणार त्याचा प्रमुख उमेदवारांच्या जय-पराजयाच्या गणितावर काही परिणाम होणार का?,बसपाचे स्वरूपकुमार जानकर हेही किती मते मिळवणार, यावरही माढ्याचा निकाल ठरणार आहे.
राजकीय पक्षाचे ९, अपक्ष २३ रिंगणातमाढा लोकसभा मतदारसंघात तब्बल ३२ उमेदवार आहेत. यामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे तीन, तर नोंदणीकृत राजकीय पक्षांचे ६ जण रिंगणात आहेत. म्हणजे विविध राजकीय पक्षांचे ९ उमेदवार माढ्यात नशीब अजमावत आहेत, तर अपक्ष २३ जणही मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील रहिवासी असणारे १०, तर सोलापूरमधील २२ उमेदवार आहेत. माढा मतदारसंघात अनेक राजकीय उलथापालथी झाल्याने निवडणुकीत चुरस वाढलेली आहे.