सातारा : प्लास्टिकच्या वस्तूंचा गरजेपुरता वापर केला की त्या कुठेही फेकून दिल्या जातात; पण अशा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूही बनविता येतात अन् त्या घराची शोभाही वाढवू शकतात, हे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. या वस्तूंमध्ये आईस्क्रिमच्या काड्यांपासून बनविलेला टुमदार बंगला आहे. प्लास्टिकच्या ग्लासचे आकर्षक झुंबर अन् स्ट्रॉच्या फुलदाण्याही आहेत. एवढंच काय पण नारळाच्या करवंटीचा उंदीर अन् मासेही आहेत. स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हस्तकलांचे प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कलाशिक्षक घनश्याम नवले आणि संदीप माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हस्तकला शिकत आहेत. मुलांनी प्लास्टिकचे ग्लास, कप, नारळाच्या करवंट्या, अगरबत्तीचे बॉक्स, कापूस, मोजे, आईस्क्रिमच्या काड्या अशा टाकाऊ वस्तूंपासून अनेकविध वस्तू बनविल्या आहेत. मोज्यांपासून सुंदर बाहुल्या तर खराब कॅलेंडरपासून फुले बनविली आहेत. स्मरणचित्रे, कोलाज, प्लास्टिकच्या कपांचा आकाशकंदील, फुलदाण्या, ठसेकामाचे विविध प्रकार, विविध डाळी, रंगीत पेपर, कापड याचा वापर करून बनविलेल्या वस्तू लक्ष वेधून घेत आहेत. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपल्या अनोख्या कलेतून आदरांजली वाहण्यात येते. या उपक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव गोखले, सदस्य अमित कुलकर्णी, शालाप्रमुख हसिना फकीर, उपशालाप्रमुख हेमंत देशपांडे, पर्यवेक्षक छाया वाचासुंदर, दिलीप कांबळे, बाळकृष्ण सकुंडे यांचे सहकार्य लाभत असल्याचे नवले यांनी सांगितले. (प्रतिनिधी) फोमपासून बनविले बैलगाडीचे चाक या शाळेतील कलाशिक्षक सातत्याने नवनवीन कलाकृती तयार करण्यासाठी प्रयत्न करत असतात. शिक्षण विभागाने राष्ट्रीय कला महोत्सवात प्रवेशद्वारावर मांडण्यासाठी बैलगाडीचे चाक बनविण्याची जबाबदारी कलाशिक्षक घनश्याम नवले आणि संदीप माळी यांच्यावर सोपविली होती. त्यांनी फोमपासून हुबेहूब बैलगाडीचे चाक बनविले. हे चाक कलादालनात मांडण्यात आले आहे.
काड्यांचा बंगला, ग्लासचे झुंबर अन् करवंटीचे मासे!
By admin | Published: February 08, 2016 12:12 AM