प्रगती जाधव-पाटील--सातारा -जिल्ह्यात स्पष्ट दिसणारी ‘माळीण’ म्हणून उल्लेख करण्यात येत असलेल्या काळोशी या गावावरील कडा जागीच फोडावा, अशी सूचना सर्वेक्षणानंतर करण्यात आली आहे. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पथकाने या कड्याची सद्य:स्थिती जाणून घेऊन ही सूचना मांडली आहे.सातारा तालुक्यातील काळोशी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. या डोंगराचा काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून गावावरील संकट बनून उभे राहिले आहे. याविषयी ‘लोकमत’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते; पण कागदी घोडे नाचविण्याव्यतिरिक्त शासनाकडून काहीच घडले नाही. याविषयी माहिती घेऊन येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या भूगोल विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी काळोशी गावात पोहोचले. डोंगराच्या पायथ्याला उभे राहिल्यानंतर आ वासून उभे असलेले निसटलेले कडे पाहून विद्यार्थी, प्राध्यापक अवाक् झाले. भूगोलाचे बी. ए. भाग ३ मधील आठ विद्यार्थी, २५ विद्यार्थिनी आणि प्रा. सुभाष कारंडे व प्रा. हनुमंत सानप यांनी या डोंगरमाथ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. परस्परांच्या हाताला धरून विद्यार्थ्यांनी डोंगरमाथा गाठला आणि मग तिथून सुरुवात झाली मोजमापे घेण्यास. तीव्र उतारामुळे मोजमापे घेताना तोल जाण्याचे आणि पडण्याचे प्रकारही झाले; पण ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी जखमा सोसून विद्यार्थ्यांनी पाहणी पूर्ण केली. अडीचशे ग्रामस्थांच्या जिवावर कडापरळी खोऱ्यातील काळोशी हे गाव डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. या गावातील अनेक घरांमधील कर्ते पुरुष मुंबईला किंवा साताऱ्यात नोकरीसाठी असतात. त्यामुळे दिवसभर गावात लहान मुलं, वृद्ध आणि महिलाच असतात. सुमारे पाचशे लोकवस्ती असणाऱ्या या गावातील अनेकजण शेती करतात. जोराच्या पावसाने कडे निसटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कड्यांमध्ये आता झाडे वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कड्याचा भाग निसटण्याची दाट शक्यता आहे. प्रथमदर्शनी हा कडा जागीच फोडावा, काही ठिकाणी संरक्षण जाळी बसवावी आणि मोठ्या बुंध्यांच्या झाडांची लागवड करावी, असे उपाय सुचविण्यात आले आहेत. भयावह कड्याची वास्तविकतायेथील कड्याची उंची आणि रुंदी दहा मीटर आहे, तर त्याची लांबी ४० मीटर आहे. जर हा कडा निसटला तर २३० मीटर उंचीच्या उतारावरून अवघ्या गावाला भुईसपाट करून मगच हा कडा विसावेल, अशी भीती अभ्यासकांनीही व्यक्त केली आहे. हा कडा अडवून ठेवायला कोणताच अडथळा येथे नसल्याने कड्याची भयावह स्थिती अंगावर शहारे आणणारी अशीच आहे.अहवाल पोहोचणार शासनदरबारी शासकीय यंत्रणांनी जबाबदारी झटकली असली तरी महाविद्यालयाच्या युवकांनी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि भूगोल विभागप्रमुख डॉ. एस. बी. झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कड्याची पाहणी केली. पाहणीचा सविस्तर अहवाल लवकरच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आपत्ती व्यवस्थापन या शासकीय विभागांसह ग्रामस्थांनाही देण्यात येणार आहे.
काळोशीचा कडा जागीच फोडा
By admin | Published: January 08, 2016 11:32 PM