चाफळ : पाऊस लांबला असला तरी पुन्हा धांदल उडायला नको, यासाठी शेतकरी पेरणीसाठी लागणाऱ्या औजारांसह नियमितपणे शेतकऱ्यांचा सोबतीचा मित्र असणारी कुऱ्हाड, विळा, खुरपे यांना पाणी देण्यासाठी व कोळपे, कुळवफासे बसविण्यासाठी सध्या लोहारांचा भाता चांगलाच फुलू लागला आहे. तर सुताराकडे कुऱ्हाडीच्या दांड्यापासून विळ्याच्या मुठीसह कुरीचे फन घालण्यासाठी शेतकरी वर्ग कारागिरांकडे गर्दी करू लागला आहे.शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने मोठी भरारी घेतली असली तरी ग्रामीण भागातील शेतकरी मात्र आजही पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत आहेत. यासाठी लागणारी औजारे यांची प्रतिवर्षी दुरुस्ती करण्यासाठी कारागिरांचे त्याला आजही सहकार्य घ्यावे लागत आहे.आधुनिकतेमुळे शेती कामात बदल होत गेले असले तरी हा बदल स्वीकारत शेती करणारी शेतकरी पाहावयास मिळतो. पूर्वी खरीप हंगामात सुतारमेट्यावर पहाटेपासून औजारे दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांची हजेरी असायची. कुळव, कुरी, तिफन, कोळपे, चौफन, चाडे, मोगणा या लाकडी औजारांची दुरुस्ती करण्यासाठी सुतारांकडे गर्दी असायची; परंतु सध्याच्या आधुनिकतेमुळे लाकडी औजारांची जागा लोखंडी औजारांनी घेतली आहे. तरीही ग्रामीण भागात मात्र पारंपरिक औजारांचाच सर्रास वापर होताना दिसून येत आहे.पूर्वीची कारागिरीची बलुतेदारीची पद्धत काही ठिकाणी आजही टिकू न आहे. पेरणीच्या लगबगीमुळे शेती औजारांची दुरुस्ती करण्यासाठी लोहारांचे भाते फुलले आहेत, तर लाकडी औजारे तयार करण्यासाठी सुतारांची तासणी चमकू लागली असल्याचे चित्र आहे. लोहारांनी बनविलेली औजारे तालुक्यातील बाजाराच्या ठिकाणी विक्रीसाठी येत आहेत. शेतीमध्ये आधुनिकता आली असली तरी पाटण तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात आजही पारंपरिक पद्धतीनेच शेती करण्याचा कल दिसून येत आहे. (वार्ताहर)
ग्रामीण भागात लोहारांचे भाते फुलू लागले!
By admin | Published: June 18, 2015 10:05 PM