सातारा : पूर्वनियोजनानुसार दहावी, बारावीच्या परीक्षांच्या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य गेल्या पंधरा दिवसांपूर्वी परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे साताऱ्यात केंद्रे असलेल्या शाळा प्रशासन आणि तेथील मुख्याध्यापकांना या कोऱ्या उत्तरपत्रिका व साहित्य सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार होती. या परीक्षांसाठी सातारा जिल्ह्यातील .... विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पूर्वनियोजनानुसार शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार विभागीय मंडळांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी परीक्षा केंद्रांवर साहित्य पोहोचविले होते. मात्र, यंदा हे साहित्य दीड ते दोन महिने सांभाळावे लागणार असल्याचे दिसते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे बहुतांश शाळा बंद आहेत. शिक्षक, कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित नाहीत. त्यामुळे या उत्तरपत्रिका, साहित्य सांभाळण्याचा धोका आहे. त्यामुळे एक प्रकारे या साहित्याचा शाळांवर बोजा पडला असून, मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला आहे.
चौकट :
परीक्षा कधी? पुढील प्रवेश कधी?
गेल्या वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा वेळेत झाल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या परीक्षेचे निकाल जुलैमध्ये जाहीर झाले. त्यामुळे अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया लांबली आहे.
यंदा दहावीची परीक्षा रद्द झाली. बारावीची परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील प्रवेश परीक्षा कधी होणार, हा प्रश्नच आहे.
हे साहित्य कस्टडीत...
कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट स्टीकर, सिटिंग प्लॅन, विषय आणि माध्यमनिहाय बारकोड. यासह प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य.
कोट :
दहावीच्या परीक्षेचे साहित्य आमच्या शाळेत बोर्डाकडून आले आहे. पण, परीक्षा रद्द झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हे साहित्य सांभाळण्याची कसरत आम्हाला करावी लागत आहे. बोर्डाने सर्व केंद्रांवरील साहित्य आपल्या ताब्यात घ्यावे.
- मिथिला गुजर, मुख्याध्यापक, एसईएमएस, सातारा
बारावीच्या परीक्षांचे साहित्य केंद्रांवर गेल्या दीड आठवड्यापूर्वी पोहोच झाले आहे. मात्र, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने या कोऱ्या उत्तरपत्रिका त्याठिकाणी ठेवणे असुरक्षित आहे. त्यामुळे बोर्डाने केंद्रांकडून ते साहित्य परत घेऊन स्वत:च्या स्ट्राँग रूममध्ये ठेवणं सुरक्षित आहे.
- जयेंद्र चव्हाण, कला व वाणिज्य महाविद्यालय
दरवर्षी मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य दहावी, बारावीचे परीक्षा साहित्य सांभाळतात. यंदा कोरोनामुळे अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील वर्गखोल्या सुरक्षित नाहीत. त्यामुळे बोर्डाने केंद्रांना पाठविलेले साहित्य पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा दिवस आधी ते पुन्हा केंद्रांना द्यावे.
- राजेंद्र चोरगे, गुरूकुल स्कूल, सातारा
बारावीचे एकूण विद्यार्थी :
दहावीचे एकूण विद्यार्थी :