संजय कदमवाठार स्टेशन- सातारा : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील काकडे कुटुंबीयांनी अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत राहत्या घरात आपल्या मुलाचा विवाह पार पडला. या विवाहाचे सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या लग्नाचे प्रक्षेपण पाहणारे वºहाडी व नातेवाइकांनीही या दाम्पत्याना अक्षदारुपी आशीर्वाद दिले.
आजपर्यंत २५० हून अधिक दाम्पत्याचा विवाह लावून त्यांना सुखी जीवनाचा कानमंत्र देणाऱ्या देऊर, ता. कोरेगाव येथील दीपक काकडे यांचे चिरंजीव रविकिरण आणि साखरवाडी येथील मनीषा कुमठेकर या नवदाम्पत्य नुकतेच विवाहबद्ध झाले.
फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा विवाह निश्चित झाला होता. त्यावेळी १० एप्रिल रोजी खुंटे येथील मंगलकार्यालयात हा सोहळा घेण्यात येईल, असं वधू पक्षाकडून ठरविण्यात आले होते. मात्र, २३ मार्चला जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला. त्यामुळे हा नियोजित विवाह सोहळा १४ तारखेला लॉकडाऊन उठल्यावर घेण्याबाबत ठरले. मात्र, १४ एप्रिलनंतर ही परिस्थिती कायम राहिल्याने हा विवाह ठरल्या तारखेला घ्यायचा, हे वधू-वर पक्षाकडून ठरले. त्यानुसार देऊर येथील ब्राह्मण वाड्यात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
ना व-हाडी, ना वाजत्री, ना बँड ना घोडा. कुरवलीची लगबग नाही की वरमाईची पळापळ नाही ना सत्कार सोहळा ना जावयाचं मानपान सगळंच त्यामुळे अगदीच शांततेत हा विलक्षण सोहळा पार पडला.
सकाळी साडेनऊलाच ब्राह्मणवाड्याचा मुख्य दरवाजा बंद करत हा सोहळा सुरू झाला. त्यासाठी वाठार स्टेशनचे पुरोहित खरे यांनी विवाहाची सर्व सूत्रे हाती घेतली होती. नियोजित असलेल्या देऊर येथील विवाहासाठी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र, संचारबंदी असल्याने या सोहळ्याला मुला-मुलीच्या मामा-मामींना देखील हजर राहता आलं नाही. लग्न सुरू झाल्यावर व्हिडीओ कॉलिंगवरून मुलाच्या मामाने आणि इतर वºहाडी मंडळींनी अक्षदा टाकून दाम्पत्याला आशीर्वाद दिले.
- लग्न सोहळा म्हटलं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला हा अनमोल एकमेव क्षण असल्याने लाखो रुपयांची उलाढाल करत मंडप, हॉल, वाजत्री, घोडं, जेवण, बस्ता, सोनं खरेदी, कपडे अशा सर्व गोष्टी लग्नात निश्चित होतात. मात्र, आज झालेल्या या लग्नात या सर्व गोष्टींना फाटा देत स्वत:च्या राहत्या घरात अगदी मामा-मामी शिवाय हा लग्नसोहळा पार पडला.