सातारा : ‘राष्ट्रवादी काँगे्रसच्या दारुण पराभवाची कारणमीमांसा ज्या-त्यावेळी झाली असली तरी त्याला जबाबदार असणाऱ्या कंपूलाच पुन्हा संधी मिळेल तिथे सत्तेची पदे देण्याने, पक्षाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याऐवजी आणखीनच काळवंडून जाईल,’ असा आणखी ‘शब्दवार’ खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने आणि प्रगल्भ क्षमतेने उभारलेल्या पक्षाचे अधिक नुकसान टाळण्यासाठी पक्षातील जनहितविरोधी भ्रष्ट कारभार केलेल्यांची झाडाझडती घेताना आत्मचिंतनात्मक सिंहावलोकन करून अशा कलंकितांना पवारांनी पक्षात नामधारी ठरवावे किंवा बेदखल करावे, जेणेकरून सर्वसामान्यांची पक्षाशी असलेली नाळ पुन्हा जोडली जाऊन पक्षाला पुन्हा गतवैभव मिळेल, असे पत्रकाद्वारे म्हटले आहे. उदयनराजेंनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे लोकसभेतील विधानसभेला झालेले दारुण पानिपत, पक्षातीलच काही अडेलट्टू, गर्विष्ठ आणि एकाधिकारशाही राबविणाऱ्यांच्या एकंदरित कार्यपद्धतीमुळे आणि त्यांनी केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यानेच झाले आहे. भ्रष्टाचार इतका मोठा आहे की, सध्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री, भ्रष्टाचाराची चौकशी केली तर खातेच बंद करावे लागेल, असं सागत आहेत. जनहिताकडे डोळेझाक करून सर्व सत्ता उपभोगून पक्षाला अप्रतिष्ठा यांनी मिळवून दिली तरी सुद्धा यांची शिरजोरी कमी झाली नाही. पक्षाचे अनेक आजी-माजी आमदार, पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्ते पक्षातून दूर राहू लागले आहेत. पक्षाच्या अनेक माजी आमदार, खासदारांनी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्याकडे या भावना व्यक्त केल्या आहेत. याची खात्रीच करावयाची असेल तर तातडीने माजी आमदार, पराभव झालेले उमेदवार यांची तातडीची बैठक घेऊन भावना जाणून घेतल्यास संबंधितांचे उद्दाम, बेमुर्वत, हेकेखोर आणि विलासी वर्तन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचाराचा कलंक याचे चित्र स्पष्ट होईल,असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी) )
कलंकितांना बाजूला काढा !
By admin | Published: March 15, 2015 12:16 AM