दहिवडी : माणगंगा नदीवरील आंधळी धरण सोमवारी पहाटे भरले असून माणगंगा नदी आता उगमापासून दुथडी वाहू लागली आहे. यामुळे आंधळी, टाकेवाडी, परकंदी, पांगरी, वडगाव, दहिवडी, बिदाल, गोंदवले या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावाना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.माण तालुक्याचा सरासरी पाऊस ४६५ मिलीमीटर होत असतो मात्र ही सरासरी अनेक वर्षे पावसांनी ओलंडली नव्हती. गेल्या वर्षी ७०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे माण तालुक्यातील तलाव भरले होते. तीच अवस्था यावर्षी होत आहे. आज आखेर माण तालुक्यात ५१० मिलिमीटर पाऊस पडल्याने सलग दुसऱ्या वर्षी ५०० मिलिमीटर पाऊस पडला आहे.माण तालुक्यात माणगंगा नदीवर आंधळी या ठिकाणी धरण आहे. हे धरण भरल्यानंतरच माणगंगा उगमापासून शेवटापर्यंत वहात असते. रविवारी हे धरण भरण्यासाठी २ फूट कमी होते. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास आंधळी धरणाच्या वरच्या बाजूला शिरवली, कुळकजाई, टाकेवाडी, परकंदी, मलवडी, आंधळी, भांडवली या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला.
त्यामुळे आंधळी धरणाच्या वरच्या बाजूकडील कासारवाडी, बोलाई, परकंदी, टाकेवाडी, शेडगेवाडी, गायदरा हे ओडे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागल्याने आंधळी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली. पहाटे तीनच्या सुमारास आंधळी धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले.माणगंगा नदी दुथडी वाहात असून या नदीवरील आंधळी, बिदाल, दहिवडीतून शेवरीकडे जाणारे पुल पाण्याखाली गेले आहेत. या पुढे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आंधळी धरण भरले असून याचा बिदाल, आंधळी, पांगरी परिसरातील शेतीला फायदा होणार आहे. या धरणाला डावा कालवा वडगावपर्यंत तर उजवा कालवा दहिवडीपर्यंत असून हे दोन्ही कालवे आता दुरुस्त करणे गरजेचे आहे.