नवनाथ जगदाळेदहिवडी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले माणगंगा नदीवरील आंधळी धरण गुरुवारी सकाळी ६ वाजता भरले. सांडव्यातून पाणी पडल्याने माणगंगा नदी दुथडी भरून वाहती झाली आहे.माण तालुक्यातील ढाकणी, राणंद, गंगोती, लोधवडे हे तलाव भरले असून गुरुवारी आंधळी धरण भरले आहे, तर ब्रिटिशकालीन पिंगळी तलावामध्येही पाण्याची मोठी आवक चालू आहे. याशिवाय झाशी तलावही भरण्याच्या मार्गावर असून महाबळेश्वरवाडी, मासाळवाडी आणि जांभूळणी तलाव भरण्याचे अद्याप बाकी आहे.माण तालुक्यात सुरुवातीला पाऊस कमी होता. मात्र, परतीच्या पावसाने विशेषत: ऑक्टोबरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. आंधळी पाणलोटामध्येही गेले आठ दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे माणगंगा नदीवर असलेल्या आंधळी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. त्यानंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरले.
या धरणाचा पाणीसाठा ०.२६७ अब्ज घनमीटर एवढा असल्याने या धरणावर बिदाल, आंधळी, टाकेवाडी, पांगरी, बोडके, दहिवडी गोंदवले या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न अवलंबून असल्याने तो प्रश्न आता सुटला आहे. माणगंगा नदीवर असणारे ३० ते ४० बंधारे भरले असल्याने आता माणगंगा पूर्णपणे वाहती झाली आहे.
चौदा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखालीआंधळी धरणामध्ये ०.२६७ अब्ज घनमीटर एवढा पाणीसाठा होत असतो. या धरणाच्या माध्यमातून डावा व उजवा कालवा अपूर्ण असून हा पूर्ण झाल्यास १४५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
आंधळी आतापर्यंत दहा वेळा भरलेया आंधळी धरणाचे काम २००० साली पूर्ण झाले. त्यानंतर आज हे धरण दहाव्यांदा भरले. याअगोदर भरलेल्या तारखा पुढीलप्रमाणे - ८ ऑक्टोबर २००१, १ सप्टेंबर २००५, १० ऑगस्ट २००६, १० जुलै २००७, ९ सप्टेंबर २००९, ११ ऑगस्ट २०१०, २६ सप्टेंबर २०१३, २३ ऑक्टोबर २०१९, १९ सप्टेंबर २०२०, २० ऑक्टोबर २०२२