शरद देवकुळे ल्ल पळशी जन्मत:च पूर्णपणे अंध...आई-वडील व बहीण पण अंध...वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी असतानाच पितृछत्र हरपलं... सात वर्षांपूर्वी मातृछत्र पण हरपलं... बहिणीलाही दोन महिन्यांपूर्वी देवाज्ञा... तो बहिणीलाही शेवटचा निरोप देण्यासाठी येऊ शकला नाही! एखाद्या मराठी चित्रपटाचे हे स्क्रिप्ट वाटते, पण हे वास्तव पळशी, माण येथील दत्तात्रय खंडू देवकुळे या अंध तरुणाच्या बाबतीत घडलेली वास्तव कहाणी आहे. दत्तात्रय खंडू देवकुळे याचा जन्म पळशी, ता. माण येथील खंडू देवकुळे व शालन देवकुळे यांच्या पोटी झाला, त्याचे आई-वडील व तो पूर्णपणे अंधच व त्याला असलेली बहीण बाळुताई ही सुध्दा अंधच शिवाय भूमिहीन असलेले हे कुटुंबीय पळशीतील बेघरवस्तीत राहते. तो तीन वर्षांचा असतानाच नियतीने पितृत्व हिरावून घेतले हे कुटुंब पूर्णत: अंध असल्याने रोजगारही करता येत नव्हता. आई-वडिलांच्या पोटी नियतीनेही मुलाला दृष्टी दिली नाही. आई शालन यांनी त्याला कोरेगाव येथील प्रबोधन अंध शाळेत पहिलीसाठी प्रवेश घेतला. मात्र, दुसरीत असताना व तो अवघा सात वर्षांचा असताना नियतीने मातृछत्रही हिरावून घेतले. त्यानंतर त्याची शिक्षणाची घडी विस्कटली. त्यांची बहीण पण अंध खायचे कुठे हा प्रश्न बहीण भावांपुढे उभा राहिला. तेवढं वय पण नव्हतं निर्णय घेण्यासारखं. मात्र, खचून न जाता त्याने तिसरीसाठी पंढरपूर येथील लायन्स क्लब संचलित अंध विद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी त्याची बहीण बाळुताई ही गावात घरोघरी फिरून मागून जीवन जगत होती. दारिद्र्यरेषेखालील यादीत आईचं नाव होतं. आईने सरकार दरबारी उंबरे झिजवूनही काही उपयोग झाला नाही. घराच्या प्रतीक्षेतच आई सात वर्षांपूर्वी जग सोडून गेली त्यानंतर नवीन दारिद्र्यरेषेखालील यादीत बहीण बाळुताई हिचे नाव समाविष्ट करण्यात आले. मात्र, तिनेही स्वत:ला घर असावं म्हणून ग्रामपंचायत व संबंधित कार्यालयाचे उंबरे झिजविले. मात्र, जागा नसल्याने घरकूल बांधायचे कुठे?, अशी अडचण असल्याने गावगाडा चालवणारे नेते कानाडोळा केल्याने तिचे पण स्वप्न अपुरे राहिले. त्याचे घराचे स्वप्न पूर्ण होणार का ?वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई शालन यांचे नाव दारिद्र्यरेषेत होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने बहीण बाळुताई हिचं नाव लागलं, आता तीही मयत झाली. त्या दोघींनी दहा-पंधरा वर्षे प्रयत्न करून ही ग्रामपंचायतीने जागा नाही हे कारण पुढे करून चालढकल केली. राजकारण्यांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्षचपळशीत अनेक मोठे राजकारणी आहेत हेच राजकारणी एरवी मते द्या म्हणून जोगवा मागतात, मतांपुरतेच अशा अंध असो वा अपंगांना गोंजारतात एकदा मत मिळाले की त्यांच्याकडे वळूनही पाहत नाहीत, लोकांना आश्वासन देऊन सत्ता भोगतात तेच याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
अंध दत्ताच्या भाळी बेघराचं जीणं !
By admin | Published: December 26, 2016 11:53 PM