फलटण महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसून त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे गुढीपाडव्यादिवशी होणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नसून या दिवशी मी आपणाला प्रत्यक्षात भेटू शकत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा हीच माझी ताकत असून आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित रहा, मास्क घाला, सोशल डिस्टन्स ठेवा, पात्र व्यक्तींनी लवकरात लवकर व्हॅकसिनेशन करून घ्या व राज्यशासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवेदनाद्वारे जनतेला केले आहे.
रामराजे पुढे म्हणाले की, कोव्हिड-१९ या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. फलटण तालुक्यात तर दिवसोंदिवस रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. या पार्श्वभूमीवर मी प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन नगरपरिषद मालकीचे असणाऱ्या सांस्कृतिक भवन येथील नवीन इमारतीमध्ये नव्याने शंभर बेडचे रुग्णालय तात्काळ उभे करण्यात आले आहे.
तरी या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास निश्चितपणे आपण या महामारीचा मुकाबला यशस्वीपणे करू शकतो असेही रामराजे शेवटी म्हणाले. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. फलटण तालुका व शहरच्या विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन मंगळवार, दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजता, ब्लड बँक, श्री ज्ञानेश्वर मंदिर शेजारी करण्यात आले आहे.