परळी: श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड येथे पूज्य आक्कास्वामी (समर्थशिष्या) यांच्या त्रिशताब्दी पुण्यतिथीनिमित्त श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड आणि अक्षय ब्लड सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, व्यवस्थापक नंदकुमार मराठे यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच क्षीरसागर, दत्त मामा आणि सर्व सेवेकरींचे सहकार्य लाभले.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने भाविकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि शिबिरात तब्बल ८१ दात्यांनी रक्तदान केले.
मानवी रक्त हे कोणत्याही कारखान्यात तयार होऊ शकत नाही. मानवी रक्ताचा एकच स्त्रोत, तो म्हणजे निरोगी मानवी शरीर. म्हणजेच रक्त हे फक्त निरोगी व्यक्तीने स्वयंप्रेरणेने केलेल्या रक्तदानातूनच उपलब्ध होऊ शकते. म्हणून अधिकाधिक तरुणांनी वेळोवेळी रक्तदान करून समाजोपयोगी कार्यात सतत सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले.