नागठाणे : सातारा तालुक्यातील नागठाणे येथे ‘लोकमत’ व सरकार मित्र ग्रुप नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिक व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने ‘रक्ताचं नातं’ या मोहिमेअंतर्गत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवारी नागठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हे शिबिर उत्साहात पार पडले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी नागठाणेच्या सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, बोरगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, सामाजिक कार्यकर्ते व सरकार मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरात नागठाणे, गणेशवाडी, भरतगाववाडी, सासपडे, दुटाळवाडी, तारळे, आवर्डे, कडवे, निनाम, मांडवे, पाडळी, अतित, खोजेवाडी, वर्णे, बोरगाव, शेद्रें, सातारा, कठापूर, तासगाव, शिवाजीनगर या गावांतील युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. सरकार मित्र परिवाराने केलेल्या आवाहनानुसार १३० रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकीतून रक्तदान केले.
सर्व रक्तदात्यांना ‘लोकमत’, अक्षय ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मान्यवर, ‘लोकमत’ आणि सरकार मित्र ग्रुपच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
फोटो : १२ नागठाणे रक्तदान
सातारा तालुक्यातील नागठाणे येथे रविवारी पार पडलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (छाया : अमित जगताप)
लोगो :