सातारा : अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर कटाक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेने पाच पथकांची नेमणूक केली आहे. अत्यावश्यक सेवेत नसताना जर कोणी कोणी दुकान उघडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील अशांवरही पालिका कारवाई करणार आहे.
राज्य शासनाने दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक दुकानदार लपून-छपून व्यवसाय करीत असल्याचा प्रशासनाला पूर्व अनुभव आहे. त्यामुळे अशा दुकानदार, व्यावसायिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने पाच विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके शहरात गस्त घालून अशा दुकानदारांचा शोध घेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची दुकाने तातडीने सील केली जात आहेत.
दरम्यान, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे दुकानदार, विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पालिकेने नियमांचे उल्लंघन करणारी १५ दुकाने आतापर्यंत सील केली असून, काहींवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने पालिकेने यंदा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व्हे नागरिकांची कोरोना चाचणी व लसीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
(चौकट)
कोरोना चाचणीसाठी शिबिर
सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ज्या अपार्टमेंटमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत अशा ठिकाणी शिबिर आयोजित करून नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. शहरात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
(चौकट)
प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हे
सातारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील संख्या ९९ इतकी झाली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा पालिकेकडून सर्व्हे केला जात आहे. येथील नागरिकांच्या आरोग्य नोंदी दररोज घेतल्या जात आहेत. अंगणवाडी सेविकांचे पथक या कामी नेमण्यात आले आहे.
(कोट)
कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. सध्या प्रशासनाने कोरोना चाचणी, लसीकरणावर अधिक भर दिला आहे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात वेळोवेळी सर्व्हे केला जात आहे. निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. शिबिराचे आयोजन करून नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी