ढेबेवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वादात अडकलेल्या ढेबेवाडी येथील शवविच्छेदन केंद्राचे पोस्टमार्टेम करणार कोण ? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. शवविच्छेदन केंद्राच्या कारभाराबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय या दोघांनाही हात वर केल्याने शवविच्छेदनाची सोय असताना शवविच्छेदनासाठी कऱ्हाडवारी करावी लागत आहे. विभागातील लोकप्रतिनिधींसह वरिष्ठांनी तत्काळ लक्ष घालून शवविच्छेदन केंद्रासाठी चालढकल करणाऱ्यांचे पोस्टमार्टेम करावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.पाटण तालुक्यातील ढेबेवाडीनजीक वांग नदीशेजारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य विभागाकडून दहा वर्षांपूर्वी शवविच्छेदन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. पूर्वीचे ढेबेवाडी आणि आत्ता स्थलांतरित सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात असलेल्या या शवविच्छेदन केंद्रात सुरुवातीपासूनच वीज, पाण्याची समस्या होती. तरीसुध्दा प्रारंभी येथे शवविच्छेदनांची प्रक्रिया होत होती. सहा वर्षांपूर्वी ढेबेवाडी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. या रुग्णालयासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि जागा स्थलांतरित करण्यात आली. त्याचवेळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सणबूर येथे स्थलांतरित केले. आरोग्य केंद्राच्या इमारतीपासून शवविच्छेदन केंद्राची इमारत काही अंतरावर असल्याने या इमारतीचा ताबा अथवा हस्तांतरच झाले नाही. परिणामी ही इमारत गावापासून दूर असल्याने आणि कार्यान्वित नसल्याचा गैरफायदा घेत समाजकंटकांनी खिडक्यांवर डल्ला मारला आहे. या विभागात एखादी दुर्घटना, अपघात, आत्महत्या, हत्या अशा घटना घडल्यास शवविच्छेदनासाठी कऱ्हाड ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राची मदत घ्यावी लागते. यामध्ये वेळेबरोबरच तेथे डॉक्टरांची उपलब्धता; रुग्णवाहिका अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तातडीने येथील शवविच्छेदन केंद्राचा प्रश्न मिटल्यास जनतेचा त्रास कमी होईल, त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही करायला हवा. (वार्ताहर) जिल्हा परिषद आरोग्य केंद्राने आम्हाला शवविच्छेदन केंद्राचा ताबाच दिलेला नाही. त्यांच्याकडे वारंवार मागणीही केली; मात्र त्यांच्याकडेच या इमारतीचा दस्तऐवज सापडत नाही. आता नवीन ग्रामीण रुग्णालयातच शवविच्छेदन केंद्राची सोय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - डॉ. डी. बी. डोंगरे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, ढेबेवाडी ढेबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सणबूर येथे स्थलांतरित झाले आहे. त्यावेळी काय प्रक्रिया झाली याबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्या. -डॉ. एस. एस. देशपांडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सणबूर
डॉक्टरांच्या भांडणात होतोय मृतदेहांचा वांदा !
By admin | Published: September 03, 2015 10:11 PM