शिरवळ : वडगाव पोतनीस गावच्या हद्दीमध्ये कामावरून सुटल्यानंतर हात-पाय धुण्यासाठी तलावाकडे गेलेला परप्रांतीय मजूर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी आढळला. वीरेंद्र सिंग शेखावत (वय २४, मूळ राजस्थान, सध्या रा. खंडाळा) असे बुडालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. शिरवळ पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स व सातारा येथील शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, भोर-शिरवळ भोईराज जलआपत्ती पथकाच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबविली होती.
याविषयी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वडगाव पोतनीस येथे एक प्लॉटिंगचे काम सुरू आहे. त्याठिकाणी राजस्थान येथील परप्रांतीय बांधकाम मजूर काम करत आहेत. यामधील वीरेंद्र सिंग शेखावत हा काम संपल्यानंतर हात-पाय धुण्यासाठी इतर मजुरांबरोबर तलावाकडे गेला. त्याठिकाणी वीरेंद्र याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात पडला.
यावेळी इतर मजुरांनी आरडाओरडा केला असता, त्याठिकाणी कोणालाही पोहता येत नसल्याने व रात्रीची वेळ असल्याने संबधित ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबतची माहिती शिरवळ पोलिसांना मिळताच शिरवळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक उमेश हजारे, पोलीस हवालदार संतोष मठपती, संतोष ननावरे, दत्तात्रय धायगुडे यांनी घटनास्थळावर जात सामाजिक कार्यकर्ते व महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या सहकार्याने तलावामध्ये वीरेंद्र शेखावत याच्यासाठी शोधमोहीम राबविली. शिरवळ पोलिसांनी भोर-शिरवळ भोईराज जलआपत्ती पथकाच्या मदतीने शोधकार्य करत मृतदेह शोधण्यात यश मिळवले.