माणिक डोंगरेमलकापूर : पार्टीसाठी गेलेला इसम कोयना नदीपात्रात बुडाला होता. आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळ जाधव पानवठ्यावर बुधवारी (दि. २८) ही घटना घडली होती. बुडालेल्या इसमाच्या मृतदेहाचे शोधकार्य तीन दिवसांपासून सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळच नदीपात्रात तरंगताना आढळला. दादासाहेब आर्जून दनाने (वय ४६ रा. जयमल्हार कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर ता. कराड) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादासाहेब दनाने यांच्यासह पंधरा जण पार्टी करण्यासाठी आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळ असलेल्या जाधव पानवठ्यावर गेले होते. पार्टी करून सर्वजण नदीत पोहायला गेले होते. सर्वजण नदीतून बाहेर आले मात्र दादा दनाने हा कोणाला दिसलाच नाही. तो नदीपात्रात बुडाला याची खात्री झाल्यानंतर शोधाशोध करूनही तो सापडला नाही. यानंतर संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घाटनास्थळी धाव घेतली. दनाने यांचा शोध घेण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले. मात्र शोध लागला नाही. आज, शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही शोध घेताना त्याचा मृतदेह पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळच नदीपात्रात तरंगताना आढळला. दनानेचा मृतदेह बघताच नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Satara: कोयना नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, पार्टी करुन पोहायला गेले असता घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 4:15 PM