सातारा : राज्याच्या सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय ५०, रा.गोखलेनगर,पुणे) हे काल, गुरुवारी दुपारी सारोळा परिसरातून बेपत्ता झाले होते. त्यांचा निरा नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. एनडीआरएफ व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना ३६ तासानंतर आज सकाळी घोरपडे यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पुणे येथील शिवाजीनगर याठिकाणी असणाऱ्या कार्यालयातील सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे हे त्यांचे मित्र प्रदीप मोहिते यांची कार (एमएच-११ सीडब्ल्यू ४२४४) घेऊन गुरूवारी दुपारी कार्यालयातून बाहेर पडले. घोरपडे हे नेहमीप्रमाणे कार्यालयातून साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी येत असतात. मात्र सायंकाळी सात वाजले तरी ते घरी न आल्याने व त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांच्या पत्नीने त्यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांना याबाबतची कल्पना दिली. त्यांनी कार्यालयात चौकशी केली असता त्याठिकाणी शशिकांत घोरपडे हे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयातून गेल्याचे समजले. दरम्यान, सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रदीप मोहिते यांच्या मोबाईलवर खेड शिवापूरच्या टोलनाक्यावरुन फास्टटँगचा संदेश प्राप्त झाला.नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमधील शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका कंपनीसमोर त्यांची कार सापडली. एका हाँटेलमधील सीसीटीव्हीत सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी चहा पिल्याचे निदर्शनास आले. निरा नदीच्या पात्रालगत सीसीटिव्हीमध्ये एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले आहे. मात्र, नेमक्या कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे. हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम व गोताखोर तसेच स्थानिक मच्छिमार यांच्यामार्फत नीरा नदीपात्रात रात्री शोधकार्य सुरु होते. अखेर आज घोरपडे यांचा मृतदेह हाती लागला.
बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह निरा नदीत सापडला
By दीपक शिंदे | Published: October 14, 2022 12:36 PM