वाठार स्टेशन : अंबवडे-सोळशीच्या माळरानात दि. ६ मे रोजी तीस वर्षीय युवकाला मारून त्याला पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. चार महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लागला असून, पुणे येथे पकडलेल्या टोळीच्या म्होरक्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधातून सिन्नर, (जि. नाशिक) येथील तरुणाला पिंपोडे खुर्द हद्दीत आणून ओघळीत मारून जाळून टाकल्याचे त्याने पुणे पोलिसांना सांगितले. माळरानावर निर्जनस्थळी मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. वाठार पोलिसांनी चौकशी करूनही मृत्युमुखी युवक व मारेकऱ्यांची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. प्रवाशांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून नागरिकांना चारचाकी गाडीत बसवून निर्जनस्थळी सोडणाऱ्या पाचजणांच्या टोळीस पुणे येथील गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले होते. या टोळीने १४ गुन्हे केल्याचे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी वदवून घेतले. याचवेळी या टोळीतील म्होरक्या ललित खुल्लम याने वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून एकाचा खून केल्याची धक्कादायक माहिती दिली. संबंधित युवक हा नाशिकमधील सिन्नर येथील असल्याचे उघड झाले आहे. पकडलेल्या टोळीतील पाचही जणांना आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अंबवडे-सोळशी रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. याशिवाय ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावरच एका विद्युत कंपनीचे वीजगृह आहे. या ठिकाणी कायमच सुरक्षारक्षक तैनात असतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी शेताचा बांध किंवा पडिक भागातील गवत पेटवत असतात. यामुळे संबंधित युवकास ज्या ओघळीत मारून पेटविण्यात आले होते, त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. पिंपोडे खुर्द शिवारात पेटवून दिलेला युवक हा नाशिक जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्यानंतर त्याचा खून होण्यामागे अनैतिक संबंध असल्याने या घटनेस वेगळेच वळण दिले आहे. ‘शीना बोरा’ प्रकरणामुळे पोलीस सावध मुंबईतील शिना बोराचा खून उघडकीस आणताना पोलिसांनी तपासात केलेल्या घाईगडबडीवर बरीच चर्चा झाल्यामुळे सोळशी घाटातील खूनप्रकरणी पोलिसांनी अत्यंत सावधानता बाळगली आहे. हा मृतदेह सिन्नरमधील नेमका कोणाचा, याची कुणकुण लागली असली, तरीही खात्री पटल्याशिवाय माहिती उघड करण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली आहे. डीएनए अहवाल पुण्याहून आल्यानंतरच मृतदेहाची ओळख जाहीर केली जाणार आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी किसन मेढे यांनी आपला मुलगा पवन (वय २५) हा बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. यासंदर्भातील कागदपत्रे घेऊन किसन मेढे यांना सातारा जिल्ह्यात पाठवून देण्यात आले आहे.
‘तो’ मृतदेह सिन्नरच्या तरुणाचा!
By admin | Published: September 15, 2015 11:54 PM