वेळे : कवठे ( ता. वाई ) येथील महामार्गालगत असलेल्या किसन वीर स्मारकाशेजारील ज्वारीच्या उभ्या पिकामध्ये एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कवठे येथील किसन वीर स्मारकाशेजारील भानुदास पोळ यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना ऊस तोडणीसाठी असलेले कामगार शेजारील ज्वारीमध्ये गेले असता त्यांना ज्वारीमध्ये एक पुरुष व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसली. म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिले. संबंधित व्यक्ती मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हा प्रकार घटनास्थळावर उपस्थित असलेल्या अविनाश देवकर व शेतमालक संदीप पोळ यांना सांगितला. संदीप पोळ यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे ४५ वय असलेला अंगात लाल बनियान व काळ्या रंगांची पॅंट परिधान केलेला पुरुष ज्वारी पिकात मधोमध मृतावस्थेत आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसत असून त्याच्या उजव्या कानात बाळी घातलेली आहे . अंदाजे २ ते ३ दिवसांपूर्वी ती व्यक्ती मृत झाली असण्याची शक्यता आहे व ज्या ठिकाणी मृतदेह पडला होता त्याच्या आसपासच्या ज्वारी पिकाची झटापटीत नासाडी झाल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. पोशाखावरून ती व्यक्ती ही ऊसतोड टोळीतील कामगार किंवा एखाद्या ट्रकवरील क्लिनर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डोक्याच्या पाठीमागेसुद्धा मारहाण झाली आहे. याबाबतची माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना कळताच त्यांनी तातडीने उपनिरीक्षक निवास मोरे, फौजदार अवघडे, डी. एन. गायकवाड, सी. एम. मुंगसे व काॅन्स्टेबल मंदार शिंदे यांना घटनास्थळावर पाठविले. उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.
सोबत फोटो : कवठे, ता. वाई येथील ज्वारी पिकात आढळलेला मृतदेह.