शेंद्रे : सातारा तालुक्यातील बोगदा-सोनगाव मार्गावर ठिकठिकाणी असणाऱ्या ओढ्यावरील पुलांना संरक्षक कठडे नसल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यास ते वाहन दहा ते पंधरा फूट खोल ओढ्यात पडून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
बोगदा-सोनगाव हा रस्ता सातारा शहराला जोडणारा असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच याच रस्त्यावर सोनगाव हद्दीत सातारा नगरपालिकेचा कचरा डेपो असल्यामुळे या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो. तसेच कचरा डेपो परिसरातच बोगदामार्गे सोनगावला येताना रस्त्याला तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. त्यातच या परिसरात मोकाट कुत्री वाहनांना आडवी येत असल्याने या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
येणाऱ्या काही दिवसांतच बोगदा-सोनगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. तरी हे काम सुरू होताना या रस्त्यावरील ओढ्यावर बांधण्यात आलेल्या पुलांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरक्षक कठडे निर्माण करावेत, अशी मागणी सोनगाव, शेळकेवाडी व आसनगाव परिसरातील ग्रामस्थांच्याकडून करण्यात येत आहे.
फोटो :
१६शेंद्रे
बोगदा-शेंद्रे मार्गावर ओढ्यावर संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. (छाया : सागर नावडकर)