लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : बोगस कर्जप्रकरणी अटकेत असणाऱ्या कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह अन्य दोघांना शुक्रवारी येथील फौजदारी न्या. आर. एन. गोगले यांनी जामीन मंजूर केला. अटकेनंतर तब्बल ९४ दिवसांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांची मुक्तता झाली असून, या प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांना जामीन मिळाला आहे. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्जप्रकरणे झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ऊसतोडणी वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी ४ आॅगस्ट २०१६ रोजी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाहीत. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचे बँकेच्या नोटिसीनंतर समोर आले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी दोघांचाही जामीन फेटाळला. १४ फेब्रुवारी रोजी दोघांना कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिस कोठडी व पुढे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत कऱ्हाड शहर पोलिसांनी अचानक छापासत्र सुरू करून कृष्णा कारखान्याच्या माजी संचालकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. छापासत्रामध्ये सुरुवातीला आठ माजी संचालकांना अटक झाली. त्यानंतर कारखान्याच्या तत्कालीन कार्यकारी संचालकांना अटक करण्यात आली. तसेच दोन कामगारांनाही अटक झाली. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात तेरा आरोपींविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर अटकेत असणाऱ्या माजी संचालकांनी जामिनासाठी अर्ज सादर केला. त्यामध्ये प्रारंभी चारजणांना, गुरुवारी तिघांना तर शुक्रवारी अविनाश मोहिते, सुरेश पाटील, राहुल देसाई व संभाजी पाटील यांना जामीन मंजूर करण्यात आला. अद्यापही दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. बचाव पक्षाचा चार तास युक्तिवादया प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने अॅड. श्रीकांत जाधव व मोहन यादव यांनी काम पाहिले. दोन दिवसांपूर्वी अविनाश मोहिते व सुरेश पाटील यांचा जामीन अर्ज सादर करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीत बचाव पक्षाने सुमारे चार तास युक्तिवाद केला. त्याचवेळी सरकारी पक्षाचाही युक्तिवाद झाला होता.अन्य एका माजी संचालकालाही जामीनकृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी अटकेत असणाऱ्या अशोक जगताप (रा. वडगाव हवेली) यांनाही शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला. न्या. सी. पी. गड्डम यांच्या कोर्टात या जामिनावर सुनावणी झाली. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी न्यायालयाने जगताप यांना जामीन मंजूर केला.
बोगस कर्ज प्रकरण; मोहितेंसह चौघांना जामीन
By admin | Published: May 19, 2017 11:20 PM