सातारा : ‘जावळी तालुक्याच्या पश्चिम भागातील ५४ गावांचे पिण्याचे पाणी व सिंचनासाठी बोंडारवाडी हा बंधारा न होता धरणच होईल. येथील नागरिकांना हे निश्चितच वरदान ठरणार असून, याद्वारे येथील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर होईल,’ अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्षा कल्पना जवळ, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, बबन बेलोशे, अंकुश बेलोशे, महादेव ओंबळे, बाळासाहेब ओंबळे, हरिभाऊ शेलार,जगन्नाथ चिकणे, संतोष बैलकर, सुनील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘बोंडारवाडी धरण कृती समितीने आमदार धरण नाही तर बंधारा बांधणार, असा गैरसमज समाजात विनाकारण पसरवला आहे. राजकारण न करता बोंडारवाडी धरण झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार धरणाच्या भिंतीला बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध होता. त्यांच्याशी चर्चा करून विरोध दूर करण्यात आला आहे. अकराशे मीटरवर धरणरेषा घेण्याचे त्यांनी मान्य केले असून, त्यामुळे पाणीसाठ्यात काहीही फरक पडणार नाही. यापुढील पन्नास वर्षांची लोकसंख्या व दर माणसी ७५ लीटर पाणी धरूनच सध्याची धरणरेषा वर घेण्यात आली आहे. त्यामुळे कृती समितीने समाजात गैरसमज पसरवू नये व स्वतःचाही गैरसमज करून घेऊ नये. आतापर्यंत धरणाच्या संदर्भात मोकाशी यांच्या नेतृत्वाखालीच काम करून त्यांना सहकार्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून धरण नक्की मार्गी लागेल. त्यामुळे कुठलाही गैरसमज करू नये. बोंडारवाडी याठिकाणी धरणच होईल.’
याबाबत येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करून मान्यता घेतली आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार धरण रेषा आहे, त्याच ठिकाणी असण्याला माझा विरोध नाही. धरणात माझी जमीन जाणार नाही किंवा माझं नुकसान होणार नाही. मात्र, बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध धरण कृती समितीने दूर करावा, त्यांच्याशी चर्चा करावी व त्यांचा विरोध थांबवावा.
(चौकट)
धरणामध्ये राजकारणाचा मुद्दा नको...
बोंडारवाडी धरण हा राजकारणाचा मुद्दा होऊ नये, एवढीच माफक माझी इच्छा आहे. कोणत्याही परिस्थितीत धरण व्हावे. धरणाची भिंत कोठे असावी, ही तांत्रिक बाब आहे. मात्र, पिण्यासाठी व सिंचनासाठी जो पाणीसाठा आपल्या वाट्याला आलेला आहे, यात काहीही बदल होत नाही. धरण कृती समितीने केवळ आतापर्यंत फक्त नांदगणे येथीलच बैठकीला मला बोलावले. आमदारांना बोंडारवाडी धरण नको आहे म्हणून केटीवेअर बंधारे बांधत आहेत, असा गैरसमज यांनी समाजात पसरवला होता. असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत कृती समितीवर केला.