जागतिक पुस्तक दिन विशेष
जगदीश कोष्टी
सातारा : जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोना बाधित दवाखान्यात तर निकटवर्ती विलगीकरणात होते. काही महिन्यांपासून असंख्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घरीच विलगीकरणात आहेत. अशावेळी एकांतवास खायला उठतो. पण हा वेळ अनेकांनी पुस्तके वाचनात घालविल्याने त्यांच्यात वाचनाविषयी आवड निर्माण झाली. यातून जणू एकप्रकारे जगण्यासाठी ‘ऑक्सिजन’च मिळाला.
गेल्या काही वर्षांपासून तरुणाई टीव्ही, स्मार्ट फोनमध्येच गुंतून पडली होती. अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तकांचा अपवाद सोडला तर अवांतर वाचनच थांबले होते. यामुळे समाजातील विचारवंतांतून चिंता व्यक्त केली जात होती. सातारा जिल्हा मात्र याला काहीसा अपवाद आहे. साताऱ्यात विविध ग्रंथ महोत्सव भरवले जातात. यामध्ये लाखो रुपयांच्या पुस्तकांची खरेदी-विक्री होत असते. ग्रंथ महोत्सवातून पुस्तक घरी नेले तरी धकाधकीच्या जीवनात कितीजण पुस्तके वाचत होते, हा प्रश्न असला तरी गावोगावची ग्रंथालये असंख्य पुस्तकांनी सुसज्ज आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून नावारुपास आले आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अन् आयुष्याची परिभाषाच बदलली. लॉकडाऊन लागल्याने घरातच बसून राहावे लागत होते. सुरुवातीचे काही दिवस अनेकांनी मनसोक्त तासनतास टीव्ही पाहिला. मोबाईलवर खेळले. पण नंतर पुढे कंटाळा आलाच. अलीकडे तर कोरोना रुग्णांसाठी बेडच मिळत नसल्याने रुग्णांना घरातच स्वतंत्र खोलीत ठेवावे लागले. तर इतर कुटुंबीय वेगवेगळ्या खोल्यात थांबू लागले. कोरोनामुळे स्वत:सोबत कुटुंबीयांविषयी मनात चिंता होती. एकांतवास असल्यानेे वेळ जात नव्हता. अन् कपाटातील पुस्तके बाहेर आले. कित्येक वर्षांपासून त्यावर साचलेली धूळ बाजूला निघाली अन् चाळले जाऊ लागले. हळूहळू पुस्तके वाचनाची अनेकांना आवड निर्माण झाली. आता हेच पुस्तके मित्र बनणार आहेत.
चौकट :
भिलारमध्ये रुग्णांना घरपोच पुस्तके
‘पुस्तकांचे गाव असलेल्या भिलार परिसरातील भोसे, गुरेघर, दानवली, उंबरी, कासवंड, अखेगिनी, धावली या गावांतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर पुस्तके वाचली. कोरोना रुग्ण असतील तर तेही फोन करून पुस्तके मागवत होते. ज्यांच्याकडे पुस्तके आहेत ते रुग्णांच्या दारात जाऊन पुस्तके देत होते,’ अशी माहिती प्रवीण भिलारे यांनी दिली.
आत्मचरित्रांना पसंती
कोरोना बाधित, मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याच्या बातम्या येत असल्याने मनात नकारात्मक विचार येतात. हे घालविण्याचे काम आत्मचरित्रांनी केले. अनेकांनी स्वत:कडील पुस्तके देऊन मदतही केली.