उंब्रज, ता. कऱ्हाड येथील उमेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष संपतराव गणपती जाधव होते. सचिव विजय गायकवाड यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे तपशीलवार वाचन केले. सर्व विषय मंजूर करण्यात आले.
मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, सहकारी पाणीपुरवठा संस्थांमुळे जिरायत जमीन बागायती होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडले आहे. दिवंगत पी.डी. पाटील यांनी सह्याद्री साखर कारखान्याद्वारे कार्यक्षेत्रात उपसा सिंचन योजनांचे जाळे विणले. त्याद्वारे परिसर सुजलाम सुफलाम केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून सर्व सहकारी संस्थांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. कोणेगाव केटी वेअर बंधाऱ्याचे पुनर्जीवन करणे आवश्यक असून त्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केलेली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे दिवसेंदिवस ऊसलागण क्षेत्र कमी होत आहे. याबाबत संचालक मंडळांनी दक्षता घ्यावी.
संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. सयाजी जाधव, हंबीरराव जाधव, बाबूराव तटले, रवींद्र जाधव, शिवाजी करपे, नंदकुमार थोरात, जयंत जाधव, मोहन चौधरी, राजेंद्र जाधव, संजय जाधव, अमोल पाटील उपस्थित होते. संपतराव जाधव यांनी आभार मानले.