वाई
धर्म, जाती, प्रांत, भाषा, भेद सारे संपू दे, या ब्रीदवाक्यापासून सुरुवात करत माणसाने माणसाशी माणसासम वागणे, समाजात छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या पातळीवर भेद हा पाळलाच जातो. मी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेन आणि लढत राहीन, असे म्हणत ' भेदाभेदमुक्त मानव ' या मोहिमेला पूजा जया गणाई यांनी प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात केल्याचे उपाध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले.
कमांडर गिरीश कोणकार, वाईचे नगरसेवक दीपक ओसवाल, अशोक येवले, उद्योजिका राजश्री गायकवाड व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते भेदभावांचे स्टिकर फाडत आणि त्यानंतर त्या पारंब्यांचं कुंपण पूजा गणाई यांनी तोडून मानवतेची टोपी मुलीच्या डोक्यावर ठेवली आणि या मोहिमेला सुरुवात केली.
मोहिमेसाठी सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच वाईच्या सरपंच प्राजक्ता वनारसे यांनीदेखील पूजा गणाई यांचे अभिनंदन व कौतुक केले. कार्यक्रमात उद्योजिका राजश्री गायकवाड यांना विद्यार्थी भारतीच्यावतीने कल्याण सुंदरम हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती राज्यसचिव साक्षी भोईर यांनी दिली.
मोहिमेंतर्गत आयोजित केलेली गायन स्पर्धादेखील उत्तमरीत्या पार पडली. या मोहिमेच्या अनुषंगाने मानवतावादी दृष्टिकोनातून लिहिलेल्या शपथेचे वाचन करत पाच दिवसांच्या कार्यक्रमाचा पहिल्या दिवसाचा उपक्रम संपल्याचे राज्यप्रवक्ता आकाश पाटील यांनी सांगितले.