लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळत नसतानाच आता खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेणेही अवघड होऊन बसले आहे. २४ तास व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रुग्णांना तो इतरांबरोबर वाटून वापरायची वेळ सध्या वैद्यकीय क्षेत्रावर आली आहे. सहा आणि आठ व्हेंटिलेटरची क्षमता असलेल्या दवाखान्यात १५ रुग्ण दाखल झाल्याने एकाच व्हेंटिलेटरवर दोघांचे उपचार करण्याचा बाका प्रसंग रुग्णालयांवर आला आहे.
सातारा जिल्ह्यात कोविड रुग्णांचा स्फोट होऊ लागला आहे. गेल्या तीन दिवसांत हजारांचा आकडा पार केलेल्या साताऱ्यात व्हेंटिलेटर बेडची संख्या मर्यादित आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतील विषाणू अधिक आक्रमक असल्याने तरुण रुग्णांची संख्या वाढलेली पाहायला मिळते. २५ ते ३५ या वयोगटातील रुग्ण सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ८५ च्या खाली येते, त्यांना व्हेंटिलेटरची गरज भासते. सध्या रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याने व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध होणे मुश्किल होऊन बसले आहे. आपल्या रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी प्रयत्नशील असलेले नातेवाईक विविध माध्यमांतून दवाखान्यात व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अशा वेळी मर्यादित बेडसंख्या आणि अमर्याद रुग्णसंख्या यांचा ताळमेळ बसविणं अवघड होऊन बसलं आहे.
शासनाने संचारबंदीचा आदेश काढल्यानंतर बुधवारी साताऱ्याची बाजारपेठ पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेली होती. अत्यावश्यक साहित्यखरेदीच्या नावाखाली उसळलेली ही गर्दी रुग्णांच्या संख्येत नक्कीच भर टाकणारी आहे. सातारकरांनीही जगणं आवश्यक आहे, याचं भान बाळगून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा पुढील काही दिवसांत चिलटा-मुंग्यांप्रमाणे मानवमृत्यू बघण्याची वेळ येऊन उभी राहील. प्रशासनाच्या नावाने खडे फोडत बसण्यापेक्षा स्वत:च स्वत:ची सुरक्षा करणं अधिक महत्त्वाचं बनलं आहे.
चौकट :
‘हॅपी हैपॉक्सिया’ अवस्था ठेवतेय रुग्णांना गाफील
कोविडच्या अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची हिस्ट्री काढली तर त्यात प्रत्येकाला एखाद्या दिवशी ताप येऊन गेल्याची माहिती समोर येत आहे. ताप आल्यानंतर वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेतली जातात. दुसऱ्या दिवशी ताप गेला की रुग्ण बरे झाले म्हणून इतरत्र वावरतात, वैद्यकीय क्षेत्रात याला ‘हॅपी हैपॉक्सिया’ असं म्हटलं जातं. यात रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावत जाते; पण रुग्ण आनंदी दिसतो. आठ दिवसांनी या रुग्णांना धाप लागल्याची जाणीव होते. तोवर त्यांच्या फुप्फुसावर कोरोना विषाणूचा हल्ला झालेला असतो. या अवस्थेनंतर रुग्णांवर उपचार करणं जिकिरीचं होतं आणि अगदी तरुणही थेट मृत्यूच्या दाढेत पोहोचतात.
कोट :
कोविड महामारीच्या या अवस्थेत कोणताही ताप हा कोविड म्हणूनच गणला गेला पाहिजे. तापावर कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेणं धोक्याचं ठरू शकतं. निव्वळ अंगावर काढण्याच्या वृत्तीमुळे रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. कोरोनाची दुसरी लाट आक्रमक असून याचा सर्वाधिक फटका तरुणाईला बसत आहे.
- डॉ. सुरेश शिंदे, सातारा हॉस्पिटल