ढेबेवाडी : गुढे (ता.पाटण) येथे सोमवारी सायंकाळी फिल्मी स्टाइल झालेल्या हाणामारीतील दोन्ही युवकांवर ढेबेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे पोलिसांंनी जप्त केली असून, त्यामध्ये लोखंडी पाइप आणि गावठी कट्ट्याचा समावेश आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पाटण न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
गाडी आडवी मारण्याच्या कारणावरून सोमवारी सायंकाळी दोन युवकांमध्ये पोलिसांसमोरच हाणामारी झाली होती. त्याचवेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना हत्यारांसह ताब्यात घेतले होते. पोलीस नाईक संदेश लादे यांनी याबाबतची फिर्याद ढेबेवाडी पोलिसांत दिली. त्यानुसार सचिन जनार्दन सुतार (वय ३२ वर्षे) रा.मानेगाव, रोहित सुनील माने (वय २४ वर्षे) रा. गुढे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील सचिन सुतार याच्याकडे गावठी पिस्तूल आढळून आले होते. त्याबाबत तपास केला असता बिनापरवाना हे पिस्तूल बाळगल्याचे स्पष्ट झाले, तर रोहित माने याने सचिन सुतार याच्या डोक्यात लोखंडी पाइप घातल्याने सचिन गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार आर.एल. अंकुशी करत आहेत.