खंडाळा : खंडाळा तालुक्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दुहेरी लढत होणार आहे. बाजार समितीवर झेंडा फडकविण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली असून गाववार बैठका घेऊन उमेदवार चाचपणी सुरू करण्यात आली आहे. कांदा बाजारपेठेमुळे राज्यात लोणंद बाजार समितीला विशेष महत्त्व आहे. दि. २९ जून पासून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये विकास सेवा संस्था सर्वसाधारण म्हणून १४ अर्ज तर ग्रामपंचायत विभागातून सर्वसाधारणमधून ७, अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गातून १, व्यापारी वर्गातून ४ आणि हमाल वर्गातून ३ जणांचे अर्ज आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमर झालटे यांनी दिली. दि. १३ जुलैला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.खंडाळा तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायती व ५१ विकास सेवा सोसायट्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य अधिक असले तरी काँग्रेसची ताकद डोळेझाक करुन चालणारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक प्रमाणात असल्याने पक्षांतर्गत लोकांना थांबवणे पक्षश्रेष्ठींसाठी जिकिरीचे काम आहे. योग्य उमेदवारांची निवड न झाल्यास राष्ट्रवादीला काँग्रेसशी सामना करावा लागणार आहे. काँग्रेसने तालुका पातळीवर कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन बाजार समितीसाठी स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादीतील इच्छुकांना थांबवण्याची भूमिका योग्य रितीने न हाताळल्यास या दुफळीचा फायदा काँग्रेसला होण्याची चिन्हे आहेत.सद्यस्थितीत बाजार समितीसाठी मोठे धुमशान होण्याची चिन्हे असून त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. (प्रतिनिधी)
दोन्ही काँग्रेसमध्येच होणार लढत!
By admin | Published: July 12, 2015 9:12 PM