महाबळेश्वर : महाबळेश्वर परिसरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नवजात बालकाच्या दत्तक प्रक्रियेत सहकार्य केल्याच्या कारणावरून ॲड. प्रभाकर रामचंद्र हिरवे (रा. महाबळेश्वर) व संजयकुमार जंगम (रा. महाबळेश्वर) यांना पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्य संशयित सागर ऊर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय ३०) व आशुतोष मोहन बिरामणे (२२, रा. मुन्नवर हौसिंग सोसायटी, महाबळेश्वर) या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नवजात बालकाच्या दत्तक प्रकरणात सहभागी असलेले संशयित सनी ऊर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर, योगेश दत्तात्रय बावळेकर (रा. महाबळेश्वर), आनंद हिरालाल चौरसीया (रा. कांदिवली, मुंबई), दत्तक पिता सुनील हिरालाल चौरसीया, दत्तक आई पूनम सुनील चौरसिया (दोघे रा. कांदिवली, मुंबई) तसेच मंजुर रफिक नालबंद (रा. महाबळेश्वर), अनुभव कमलेश पांडे (रा. उत्तर प्रदेश, सध्या महाबळेश्वर), घनश्याम फरांदे (रा. तामजाईनगर, सातारा) या आठ संशयितांचा महाबळेश्वर पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भागवत, पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री करीत आहेत.