साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
By नितीन काळेल | Published: October 2, 2024 08:53 PM2024-10-02T20:53:01+5:302024-10-02T20:54:03+5:30
Satara News: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात अनेकवेळा आले. पण, त्यांच्याबरोबर शरद पवार गटातील कोणीही नेता दिसला नव्हता. मात्र, बुधवारी जिल्हा बॅंक कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांच्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादीतील नेते एकाच टेबलवर जेवणासाठी बसल्याचे दिसून आले.
- नितीन काळेल
सातारा - राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात अनेकवेळा आले. पण, त्यांच्याबरोबर शरद पवार गटातील कोणीही नेता दिसला नव्हता. मात्र, बुधवारी जिल्हा बॅंक कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांच्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादीतील नेते एकाच टेबलवर जेवणासाठी बसल्याचे दिसून आले. यामुळे राजकीय चर्चांनाही उधान आले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा अमृतमहोत्सवी सांगता सोहळा साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर होता. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. कार्यक्रमासाठी दुपारी साडे बाराच्या सुमारास अजित पवार यांचे हेलिकाॅप्टरने आगमन झाले. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह जिल्हा बॅंकेचे संचालक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आल्यानंतर उपस्थित नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सैनिक स्कूल मैदानावरील सभास्थानाच्या पाठीमागेच प्रमुख राजकीय नेते, जिल्हा बॅंक संचालकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तेथे आले. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर रामराजे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील टेबलवर एकत्र जेवण करताना दिसून आले. विशेष म्हणजे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही यामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर या पक्षातील प्रमुख नेते एकत्र कधी आले नव्हते. पण, जिल्हा बॅंकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हावासीयांना वेगळेच दृष्य दिसले. यामधील रामराजे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे हे जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत.