कऱ्हाड : बनावट एटीएमकार्डचा वापर करुन पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन परदेशी नागरिकांना रविवारी सायंकाळी कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता संबंधित कार्डद्वारे ते फसवणूक करुन पैसे काढत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, आरोपींकडे आढळलेल्या ७५ बनावट कार्डपैकी ७१ कार्ड ॲक्टिव्ह असल्याची व त्यावर सुमारे ३५ लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर आली आहे. दोन्ही आरोपी गजाआड झाल्यामुळे सामान्य नागरिकांचे ३५ लाख रुपये वाचले असल्याचे पोलिसांनी सांगितले.मलकापूर येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये रविवारी सायंकाळी दोन परदेशी नागरिक गेले होते. एटीएमचा सुरक्षारक्षक त्यावेळी बाहेर उभा होता. एटीएममध्ये गेल्यानंतर संबंधित दोघांनी वारंवार वेगवेगळी एटीएम वापरून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरक्षारक्षकाने एटीएम केंद्राचे शटर ओढून बाहेरून ते बंद केले. तसेच याबाबतची माहिती क-हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी.आर. पाटील यांना दिली. पोलिसांनी तातडीने संबंधित दोन्ही परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांना ७५ बनावट एटीएमकार्ड आढळून आली.दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी मलकापुरातील त्याच एटीएममधून एका नागरिकाच्या खात्यावरील २१ हजार ६०० रुपये अज्ञातांनी काढले होते. त्याबाबतची तक्रार क-हाड शहर पोलिसात दाखल झाली होती. त्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फुटेजमध्ये दोन परदेशी नागरिक पैसे काढताना दिसून आले होते. त्यामुळे तेव्हापासून पोलीस परदेशी नागरिकांवर वॉच ठेवून होते. त्यातच रविवारी ते दोन आरोपी पुन्हा त्याच एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना रंगेहाथ सापडले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.दिल्ली, कोल्हापुरातही गुन्हेपोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी रोमानिया देशातील आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर आणि दिल्लीतही अशाच पद्धतीने गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम क-हाड शहर पोलिसांकडून सुरू आहे.
दोघे परदेशी नागरिक वापरत होते तब्बल ७५ बनावट एटीएमकार्ड, ॲक्टिव्ह कार्डवर होते ३५ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 2:15 PM