सातारा : शाहूनगरीत पालिकेचा गड कोणाच्या ताब्यात जाणार? याविषयी गल्लोगल्ली चर्चा झडत असतानाच आपल्या सरदारांना बळ देण्यासाठी दोन्ही राजे मैदानात उतरले आहेत. मनोमिलन तुटल्याने दोन सत्ताधारी आघाड्या एकमेकांविरोधात शस्त्र परजून उभ्या ठाकल्या असतानाच मोदींच्या नावाचा करिष्मा आजमावण्यासाठी भाजप प्रबळ ताकदीने विरोधात उतरली आहे. तर शिवसेना, मनसे, रासप, महाराष्ट्र नागरी विकास आघाडी आदी पक्षांच्या वतीने आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न साताऱ्यात सुरू आहे. सलग दहा वर्षे पालिकेच्या सत्तेत कधी राजीखुशी तर कधी कुरबुरी करत नांदणाऱ्या सातारा विकास व नगरविकास या दोन आघाड्यांनी ऐन निवडणुकीत काडीमोड घेतला. दोन्ही आघाड्यांचे मनोमिलन कायम राहून तिसरी आघाडी या मनोमिलनाच्या सत्तेला ताकदीने विरोध करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती; परंतु तसे काही घडले नाही. मनोमिलन तुटले खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतंत्रपणे ४० उमेदवार उभे केले. दोन आघाड्यांचे मनोमिलन न झाल्याने बंडखोरी थोपवली गेली. साहजिकच भारतीय जनता पार्टीसारख्या तिसऱ्या प्रबळ पर्यायाला ४० जागांसाठी ३२ उमेदवारांवर समाधान मानावे लागले. पक्षीय राजकारणाचा रंग देत काँगे्रसनेही सातारा पालिकेत दावेदारी सुरू केली होती; परंतु काँगे्रसने अवघ्या दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सातारा पालिकेत पक्षीय राजकारण खेळण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. पक्षाचे बळ एकवटत भाजप, शिवसेना, काँगे्रस, मनसे, रासप तसेच लाल निशाण पक्ष पालिकेच्या रणांगणात उतरले आहेत. प्रत्येकजण सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडीच्या वर्षानुवर्षांच्या सत्तेला धडका देत आहेत. या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार मात्र पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांशीच टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी राजघराण्यातील वेदांतिकाराजे भोसले यांची उमेदवारी असल्याने नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत संपूर्ण सातारा शहर पिंजून काढत आहेत. सातारा विकास आघाडीने माधवी कदम या सामान्य कुटुंबातील महिलेला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली असून, खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी शहरात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दोन्ही आघाड्यांचे नगरसेवकपदाचे उमेदवार दोन्ही राजेंच्या वेळा ठरवून प्रचाराचे नियोजन करताना पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली असल्याने राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा शहरात नुकताच प्रचार फेरीत सहभाग घेतला. (प्रतिनिधी) उमेदवारांची पळापळ शहरात प्रचार फेऱ्यांमध्ये उमेदवारांचा पुरता घामटा निघताना पाहायला मिळत आहे. लोकांना हात जोडून नमस्कार करताना नेत्यांनाही कुठे घेऊन जायचे याचे नियोजन केले जात आहे. जिथे शंका आहे, नेमके तिथेच दोन्ही राजेंना नेऊन मतदारांशी चर्चा घडवून आणली जात आहे. साताऱ्यात मुख्यमंत्र्यांची सभा सातारा नगरपालिका निवडणुकीवर मंत्री चंद्रकांत पाटील बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी ते अनेकदा तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात हादरा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा मंगळवार, दि. २२ रोजी आयोजित केली आहे.
पालिकेचा गड राखण्यासाठी दोन्ही राजे मैदानात!
By admin | Published: November 15, 2016 11:41 PM