सातारा : साताऱ्यातील वाढती गुन्हेगारी हा खरोखरच गंभीर प्रश्न आहे. गुंडांना पोलिसी खाक्या दाखविण्याची वेळ आली आहे. मात्र, या गुंडांना राजकीय वरदहस्त लाभत असल्याचा होत असलेल्या आरोपात तथ्य नसून तसे असेल तर पोलिसांनी गुंडांना पोसणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. शहरातील वाढत्या गुंडगिरीला रोखण्यासाठी बिल्डर्स असोसिएशनसह विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना आमदार भोसले म्हणाले, ‘शांत साताऱ्यात वाढत असलेली गुन्हेगारी वेळीच लगाम घालणे गरजेचे आहे. यासाठी माझा नेहमीच पाठिंबा राहील. हा बेरोजगारीचा परिणाम नाही. ती तर सगळीकडेच आहे, मात्र हे सर्व नियोजनपद्धतीने होत असून गुंडांना पोलिसी खाक्या दाखवायची गरज निर्माण झाली आहे. हा प्रश्न फक्त प्रतापसिंहनगरपुरता मर्यादित राहिला नसून शहरातही गुंडगिरी वाढू लागली आहे. भाई, दादांचा वेळीच कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, यासाठी माझा नेहमीच पाठिंबा असेल. (प्रतिनिधी)
सातारा : साताऱ्यात बांधकाम व्यावसायिक व इतरांना खंडणी मागितल्याचे त्यासाठी धमकाविण्याचे, आर्थिक नुकसान घडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, भरदिवसा चेन स्नॅचिंगचे प्रकार घडतात, तसेच महाविद्यालय परिससात लल्लन गँगचे हाणामारी, दहशतीचे कारनामे घडले आहेत, हे निश्चितच सातारच्या परंपरेला शोभनीय नाही. या सर्वच बाबतीत आम्ही मागेच पोलीस प्रमुखांशी समक्ष चर्चा केली असता, लेखी तक्रार येत नसल्याने हतबलता त्यांनी व्यक्त केली. भीतीपोटी, व्यवसायापोटी संबंधित व्यक्ती तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती असली तर संबंधितांनी त्याना झालेल्या त्रासाबाबतच्या तक्रारी किमान आमच्या जलमंदिर पॅलेस येथील जनसंपर्क कार्यालयात येत्या चार दिवसांत लेखी स्वरुपांत दाखल केल्या तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही अशा तथाकथित फुटकळ गल्लीदादा, गामा-गुंगा जे कोण असतील त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नावानिशी तक्रार दाखल करु. कोणत्याही परिस्थितीत सर्वांना संरक्षण देऊ अशी आश्वासक ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. (प्रतिनिधी)