सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी मतदारसंघासाठी ९५.४३ टक्के मतदान झाले होते. साताऱ्यात मंगळवारी सकाळपासून निकालाचे धक्कादायक अपडेट यायला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा 1 मताने धक्कादायक पराभव झाला. तर, खटाव मतदारसंघातून अजित पवारांनचे उमेदवार नंदकुमार मोरे हेही पराभूत झाले. प्रभाकर घार्गे यांनी नंदकुमार मोरे यांचा पराभव केला. घार्गेंच्या या यशामध्ये त्यांच्या दोन्ही लेकींचं महत्त्वाचं योगदान आहे.
जिल्हा बँक निवडणुकीच्यानिमित्ताने एकमेकांची जिरविण्याच्या नादात राष्ट्रवादीची बालेकिल्ल्यातच पिछेहाट सुरू झाली दिसून आले. १९९९ पासून जिल्ह्यावर असलेली राष्ट्रवादीची पकड ढिली झाल्याचे चित्र असून, भाजपने शिरकाव, तर शिवसेनेने जिल्हा बँकेत प्रवेश करून भविष्यातील संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे. जावली, कोरेगाव, खटाव हे सोसायटी मतदारसंघ खरे तर राष्ट्रवादीचे हक्काचे आहेत. जावलीतून आमदार शशिकांत शिंदे, कोरेगावातून शिवाजीराव महाडिक, तर खटावमधून नंदकुमार मोरे यांना पराभवाला तोंड द्यावे लागले आहे.
या निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे हक्काचे लोक दुखावले गेले. खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांच्यासारखा मोठा नेता राष्ट्रवादीपासून बाजूला गेला. त्यांनी स्वाभिमानाने पक्षाविरोधात लढाई केली, त्यात त्यांना यश आले. खटाव सोसायटी गटात प्रभाकर घार्गे १० मतांनी विजयी झाले आहेत. नंदकुमार मोरेंना ४६ मतं तर प्रभाकर घार्गेंना ५६ मतं मिळाली. नंदकुमार मोरेंचा पराभव हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का मानला जातो. कारण, अजित पवार यांनीच मोरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं होतं.
मुलीच्या आग्रहामुळेच अर्ज दाखल
लेकीच्या आग्रहाखातर जिल्हा बँक निवडणुकीत प्रभाकर घार्गेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, अर्ज माघारी घेण्यासाठी बड्या नेत्यांचे फोन आले, शक्य तितका दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या रणरागिनींनी आता माघार नाही, म्हणत सर्वच मतदारांपर्यंत जाणे पसंत केले. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन विनंत्या केल्या. मतदारांनीही पोरींच्या लढ्याला बळकटी देताना सकारात्मक कौल दिला. प्रभाकर यांच्या प्रिती आणि प्रिया या दोन मुलींनी वडिलांसाठी जीवाचं रान करत निवडणूक प्रचार केला आणि निकालानंतर अत्यानंद झाला.
आईसह दोन बहिणींनी केला प्रचार
आई आणि दोन लेकींनी मतदारांच्या घराचे उंबरठे झिजवत, वडिलांच्या हक्काच्या माणसांची साथ-सोबत घेऊन प्रचार केला. वडिल तुरुंगात असताना त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या तीन महिलांच्या लढाईमुळे येथील निवडणूक भावनिक बंध जपणारी ठरली. या भावनिकतेतून मतदारांनी प्रभाकर घार्गेंच्या बाजुनेच विजयी कौल दिल्याचे दिसून आले. वडिलांना एका कथित प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, लेकीनं जिल्हा बँक निवडणूक विजयातून आपला रोष दाखवून दिला. कमी वयातच राजकारण परिस्थितीने राजकारणाचे धडे मिळाले अन् पहिल्याच प्रयत्नात मोठं यशही कमावलं.