सातारा : पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज नेत्यांना अर्थात राजेंना चक्क राजकीय सीमोल्लंघनाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषद अध्यक्षपदासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नावाची मुंबईत जोरदार चर्चा चालू असतानाच त्यांच्याच फलटणमध्ये आज, शुक्रवारी होणाऱ्या उदयनराजेंच्या बैठकीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.शरद पवार घराण्याचे निष्ठावान म्हणून रामराजेंना सत्तांतरानंतरही मोठी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी रामराजेंचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर फलटण तालुक्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. तरीही जिल्ह्यातील राजकारणात रामराजे सक्रिय होते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जिल्ह्यातील बालेकिल्ला राखला. लोकसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मताधिक्य मिळवून देणाऱ्या फलटण तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्यात रामराजेंनाही यश मिळाले. या पार्श्वभूमीवर रामराजेंच्या नावाची चर्चा विधान परिषद अध्यक्षपदासाठी होणे, हे फलटणवासीयांसाठी कौतुकाची गोष्ट ठरली आहे.दरम्यान, राष्ट्रवादीचेच खासदार उदयनराजे भोसले हे आज फलटण येथे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. ‘निरा-देवघर’चे पाणी बारामती-इंदापूरऐवजी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना मिळाले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत उदयनराजेंनी शिवसेनेचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या मताला सहमतीच दर्शविली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील भाजप, सेना व काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनीही उदयनराजेंच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. (प्रतिनिधी)
दोन्ही राजेंना वेध सीमोल्लंघनाचे!
By admin | Published: March 12, 2015 11:38 PM