फलटण : झारखंडमध्ये आयोजित ११ व्या इंडिया सब ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी मुलींच्या महाराष्ट्र संघात फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या माध्यमातून बालेवाडी, पुणे येथेे, झारखंडमध्ये आयोजित हॉकी इंडिया सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये राज्यातून ६० ते ७० खेळाडू सहभागी झाले होते. मुधोजी हायस्कूलच्या श्रावणी विनोद बनकर व दीक्षा नितीन शिंदे या दोन खेळाडूंची महाराष्ट्र मुलींच्या संघामध्ये निवड झाली आहे. फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या दोन्ही खेळाडूंनी मागीलवर्षी झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर हॉकी स्पर्धेत कास्यपदक पटकाविले आहे.
दीक्षा शिंदे हिची मागीलवर्षी १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती. दोन्ही खेळाडू हॉकी संघटना सातारा यांच्यावतीने निवड चाचणीसाठी सहभागी झाल्या होत्या.
फलटण येथील दोन्ही राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आला.
खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूलचे हॉकी क्रीडा मार्गदर्शक सचिन धुमाळ व बी. बी. खुरंगे, क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
निवडीबद्दल विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्राचार्य के. बी. खुरंगे यांनी अभिनंदन केले आहे.