सातारा : मारहाण करून जबरदस्तीने मोबाईल घेऊन पसार झालेल्या दोघांना सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाºयांनी दोन महिन्यानंतर अटक केली.
निकेत उर्फ बालोशा वसंत पाटणकर (रा. चंदननगर, कोडोली सातारा), आकाश उर्फ गुंड्या ज्ञानेश्वर कापले (रा. दत्तनगर, कोडोली सातारा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय पोपट ढाणे (रा. कारंडवाडी, पो. देगाव) हा रंगपंचमीदिवशी सायकलवरून जात होता. यावेळी निकेत आणि आकाशने त्याला अडवले. रंग लावण्याचा बहाणा करून त्याला मारहाण केली. तसेच त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन पलायन केले होते. या घटनेनंतर अजय ढाणे याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या घटनेपासून संबंधित दोघे पसार होते. कोडोली परिसरात शनिवारी दुपारी आल्याचे समजताच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांना पकडले. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने दि. ७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील भोसले, अविनाश चव्हाण, धीरज कुंभार, संतोष भिसे, ओंकार डूबल, शिवाजी भिसे यांनी केली.