सातारा : उधारी मागितल्याने पानटपरी चालकाच्या डोक्यात बाटली मारल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नवीन औद्योगिक वसाहतीत घडली. जखमी झालेल्या पानटपरी चालकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.निकेत वसंत पाटणकर (रा. चंदननगर, कोडोली सातारा), आकाश उर्फ गुंड्या ज्ञानेश्वर कापले (रा. कोडोली सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलेश जालिंदर माने (वय २९,रा. कारंडवाडी, सातारा) याची नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये पानटपरी आहे.
या टपरीवर आकाश कापले आणि निकेत पाटणकर याने हजार ते दोन हजारांची उधारी केली होती. ही उधारी नीलेशने दोघांनाही मागितली. यावरून कापले याने नीलेशच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. तर पाटणकर याने हाताने मारहाण केली.
यात नीलेश जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेशने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कापले आणि पाटणकर यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.