मल्हारपेठ : ‘शेतकऱ्यांच्या लेकरांशी राज्यकर्ते, कारखानदारांना काहीही देणं-घेणं काही नाही. मंत्र्यांना आता कळेल, मतांसाठी भीक मागावी लागते. दारूच्या एका क्वॉर्टर इतका दुधाच्या बाटलीला दर दिला तरी तो शेतकऱ्यांना परवडला असता,’ असे मत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मांडले.निसरे फाटा, ता. पाटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, मनोज घोरपडे, दीपक पाटील-शेरेकर, बी. जी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात विकास कामापेक्षा डिजिटल बोर्ड जास्त झळकायला लागलेत. अडाणी बापाबरोबर शिकलेलं पोरगं सुध्दा गुलाम बनवायला लागलंय. उत्पादित शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत उच्च शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्थापित कारखानदार राज्यकर्त्यांच्या विरोधात लढण्यासाठी स्वाभिमानी उभी ठाकली आहे.’मनोज घोरपडे म्हणाले, ‘या तालुक्यात दोन गटांत राजकारण चालतं. शेतकऱ्यांचा कोण विचार करीत नाही. ऊस उत्पादनाच्या खर्चाचा विचार केल्यास ३,२०० रुपये दर मिळाला पाहिजे. याकरिता प्रस्तापितांची सत्ता बदलून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवा.’ पंजाबराव पाटील म्हणाले, ‘पाटण तालुक्यात शेतकरी ऊसदरावर काही बोलत नाही. देईल तेवढाच दर घेतात. शेतकऱ्याने जागे व्हावे, संघटनेत शेतकऱ्यांना न्याय मिळत असतो.’ या कार्यक्रमात बी. जी. पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
दारूच्या बाटलीइतका तरी दर शेतकऱ्यांच्या दुधाला हवा होता
By admin | Published: September 01, 2014 9:26 PM