नम्रता भोसले ।खटाव : उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी आता जनता हैराण होत आहे. सूर्यनारायण दिवसेंदिवस आग ओकायला लागले आहेत. खटाव परिसरातील विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे अजून उर्वरित असलेले उन्हाळ्याचे दोन महिने कसे जातील? याची चिंता सतावू लागली आहे.
खटाव परिसर मुळातच कमी पावसाचा आहे. त्यातच उन्हाळ्याचा भडका वाढत आहे. शेती पाण्याचा प्रश्न तर गंभीरच बनला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सर्वांना तीव्रतेने भेडसावू लागला आहे. पाण्याची दिवसेंदिवस खालावत चाललेली पातळी पाहता उन्हाळ्याचे महिने संपेपर्यंत सध्याची पाण्याची परिस्थिती पाहिली तर कसे होणार? याची चिंता भेडसावू लागली आहे. सध्या बऱ्याच शेतांतील विहिरींनी तळ गाठला आहे. काही विहिरी पाण्यावाचून कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. गावातील बरेच सार्वजनिक हातपंप पंप बंद पडले आहेत.
पाण्याची तीव्र टंचाई तसेच पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे. उन्हाची वाढती तीव्रता पाहता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची ही अवस्था असेल तर बाकीचे पुढील दिवस कसे जाणार? याची चिंता आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांनाही लागली आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर उपाय शोधण्याची मागणी होत आहे.टँंकर सुरू करण्याची मागणीखटाव तालुक्यात दुष्काळी पट्ट्यात मोडतो. या ठिकाणी दुष्काळाच्या झळा नेहमीच जाणवत असतात. आता मार्च महिना असतानाच परिसराील विहिरींंमधील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेंदूण पाणी काढायचे म्हटले तरी पुरेसे पाणी मिळत नाही. तहसील कार्यालय व जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या मागणीनुसार टँकर सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.खटाव परिसरातील विहिरींतील पाण्याने मार्चमध्येच तळ गाठला आहे. नागरिकांना शेंदून पाणी काढावे लागत आहे.