औंध : काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आले.
चार हजार रुपये भरून त्याने पार्सल ताब्यात घेतले अन् सत्य उघडकीस आले. त्या पार्सलमधून मोबाईलऐवजी चक्क शंभर-दोनशे रुपये किमतीचे बूट त्याच्या हाती पडले. खटाव तालुक्यातील औंध परिसरातील अनेक युवकांची अशा प्रकारच्या फसव्या कॉलने फसवणूक होत आहे.
नाव व पत्ता सांगितल्यानंतर काही दिवसांतच गावातील टपाल कार्यालयात त्या युवकाच्या नावाचे पार्सल आले. ही माहिती मिळताच त्याने आनंदाच्या भरात टपाल कार्यालय गाठले आणि चार हजार रुपये भरून आलेले पार्सल आपल्या ताब्यात घेतले.घरी आल्यानंतर त्याने पार्सल उघडून पाहिले असता त्याचा मोठा धक्काच बसला. पार्सलमध्ये मोबाईल ऐवजी शंभर-दोनशे रुपये किमतीचे बूट त्याच्या हाती पडले. आपली फसवणूक झाल्याचे युवकाच्या लक्षात आले. मात्र, घरच्यांच्याभीतीमुळे त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही.
अशा प्रकारच्या आणखी घटना औंध परिसरात घडल्या आहेत. परंतु बदनामीमुळे कोणीही याची वाच्यता केली नाही. नागरिकांनी अशा फसव्या फोन कॉल वरून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.