पाचगणी : महू धरण क्षेत्रात आजोबासोबत गेलेल्या मुलाने आजोबाचे नजर चुकवत धरणात पोहायला गेले असता त्याचा पाण्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रणव संतोष गोळे (वय ११) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महू (ता. जावळी) येथील धरणात गावातीलच शिवराम नारायण गोळे व नातू प्रणव गोळे हे दोघे गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास शिवराम गोळे हे रस्त्याला लागूनच गुरे चारत होते. गुरांना पाणी पाजून आजोबा रस्त्याकडे निघाले होते; परंतु प्रणव हा त्याचदरम्यान धरणाच्या पाण्याकडे धावत जात होता. आजोबांनी आवाज दिला; परंतु तो तसाच पळत होता. प्रणव पळत पाण्याकडे गेला आणि कपडे काढून त्याने पाण्यात उडी घेतली. आजोबांनी लगेच पुण्याला असलेला दुसरा मुलगा अजित गोळे याला कळवले. त्याने लगेच गावातील लोकांना सांगितले. त्या वेळी गावातील युवकांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. त्याचा शोध घेतला; परंतु प्रणव सापडत नसल्याने लगेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण केले. जवानांनी बोटीच्या साह्याने सव्वासहा वाजता प्रणवला शोधून काढले.