सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ येथे शिक्षणासाठी वास्तव्यास असणाऱ्या व मूळ बुलढाणा जिल्ह्यातील शिवहरी अनंत रजपूत या अकरा वर्षाच्या मुलाच्या अवयवदानामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचले.याबाबत अधिक माहिती अशी, अनंतर रजपूत हा ४ जानेवारी रोजी डिस्कळ येथील शाळेतून परत घरी येताना कारने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय तातडीने दाखल करण्यात आले; परंतु, प्रकृती गंभीर असल्याची कल्पना डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना दिली.यावेळी त्याच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा विचार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्याकडे बोलून दाखविला. त्यानुसार समन्वयक डॉक्टर सुजाता राजमाने यांनी नातेवाइकांचे तब्बल चार तास समुपदेशन केले. तसेच झेडटीसीसी पुणे यांच्याशी संपर्क साधून अनंत रजपूत याला ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले.
उपचार सुरू असताना डाॅक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर ७ जानेवारी रोजी रात्री त्याचे हृदय तसेच दोन किडनी अशा तीन अवयवांचे दान करण्यात आले. अवयवदान केलेली एक मूत्रपिंड लष्करी रुग्णालय आणि दुसरे सिम्बाॅयोसिस रुग्णालयात प्रतीक्षा यादीवर असलेल्या रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच दान केलेले हृदय पिंपरी येथील डाॅ. डी.वाय. पाटील रुग्णालयातील रुग्णांवर हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. त्यातून तीन रुग्णांचे प्राण वाचले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रकांत काटकर यांचे याकामी मार्गदर्शन मिळाले. तसेच आयसीयूमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही सहकार्य मिळाले.
कधी केले जाते अवयवदान?जिवंतपणी आपण एक किडनी, पॅनक्रियास किंवा स्वादुपिंडाचा तुकडा आणि यकृताचा एक छोटा भाग दान करून आपण रुग्णांचा जीव वाचवू शकतो. ब्रेन डेड झालेल्या रुग्णांचे हृदय, यकृत, किडनी, स्वादुपिंड, काॅर्निया, फुप्फुस, त्वचा आणि हाडांचे दान करता येऊ शकते.