सातारा : नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते; पण याचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत आहे. कारण, जाचक अटींचा अडथळा असायचा; मात्र आता बळीराजाची त्रासदायक अटीतून सुटका होणार असून, कृषी आयुक्तालयाने प्रस्तावासाठी सहा पर्याय दिले आहेत. यामुळे विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक बसण्याची शक्यता आहे.
शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्याची जबाबदारी एखाद्या कंपनीकडे असते. शेतकरी जमिनीत घेतलेल्या पिकांचा विमा उतरवतात. त्यासाठी ठराविक हप्ता भरला जातो, तसेच राज्य आणि केंद्र शासनही आपला वाटा देतात. यामध्ये नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते; पण त्यासाठी काही अटी होत्या. शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत विमा कंपनीला कळवावे लागत होते, तसेच चुकीच्या पद्धतीने ऑनलाइन माहिती भरली तर शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता नव्हती. यामुळे कंपन्या मालामाल अन् शेतकरी कंगाल, अशी स्थिती होती. परिणामी, या जाचक अटींच्याविरोधात शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर होता; पण नवीन नियमांमुळे याला कुठेतरी ब्रेक बसणार आहे.
....................................
आधी काय होते दोन पर्याय...
पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून ७२ तासांत विमा कंपनीला कळवावे लागत होते. दिनांक, वेळ, नुकसानाची कारणे, प्रकार. सर्व्हे नंबर द्यावा लागत होता. त्याचबरोबर बँक, कृषी किंवा महसूल विभाग, टोल फ्री नंबरवरही माहिती देण्याची सोय होती.
........................................
हे आहेत नवीन सहा पर्याय
- शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शूरन्स ॲपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानाची माहिती स्वत: भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी पंचनाम्यासाठी बांधावर येणार आहेत.
- तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असेल तर शेतकरी ऑफलाइन तक्रार करू शकतात.
- नुकसानाची तक्रार शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही करता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज द्यावा लागेल.
- पीक विमा कंपनीच्या मेल आयडीवरही तक्रार करता येणार आहे.
- ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी आपला विम्याचा हप्ता भरलेला आहे, त्या बँकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.
.......................................................
अतिवृष्टीने साडेसात कोटींचे नुकसान...
जिल्ह्यात यावर्षीच्या जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले. जवळपास ८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके बाधित झाली होती. तर अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले.
.........................................................