पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, आरोग्य विभाग आणि ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. यासाठी
पुसेगावच्या ३७ पोलीस कर्मचाऱ्यांनी ४६ लहानमोठी गावे, वाड्यावस्त्या दत्तक घेतल्या आहेत.
पुसेगाव पोलीस ठाण्यातील सलोखा सभागृहात सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी गावोगावचे पोलीस पाटील, ग्रामदक्षता समिती यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांविषयी चर्चा झाली. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या ॲक्टिव्ह करण्यासह सर्वसमावेशक आराखडा ठरविण्यात आला.
गावातील ग्रामदक्षता समिती, पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी त्या त्या गावातील कोरोनाबाबतीत प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष केंद्रित करून दैनंदिन अहवाल पुसेगाव पोलीस ठाण्यात देतील. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग तातडीने पावले उचलून कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही करणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी दिली.
पुसेगाव, खटाव, बुध, डिस्कळ, विसापूर ही गावे कोरोना हॉटस्पॉट ठरू लागली आहेत. अनेक ठिकाणी बाधित असूनही होम आयसोलेशनमध्ये असणारे तरुण रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय बिनधास्तपणे बाहेर फिरून कोरोना पसरवत आहेत. यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस पाटलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मछले यांनी केले.
गावोगावच्या दक्षता समित्या पुन्हा एकदा सक्रिय करून शाळा, मंदिरे, मंगल कार्यालयांमध्ये बाहेरून येणाऱ्या आणि बाधितांच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करावे, अशा सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन माहितीचे संकलन करण्यासाठी पोलीस पाटील आणि ग्रामदक्षता समितीच्या मदतीसाठी प्रत्येक गावाला एक पोलीस अंमलदार देण्यात आले आहेत. संबंधित पोलीस अंमलदार वेळोवेळी गावात भेट देतील. गस्त घालतील. तसेच पोलीस पाटील आणि ग्राम दक्षता समितीकडून दैनंदिन माहिती घेतील. त्यानुसार पुसेगाव पोलीस ठाणे संबंधितांवर कारवाई करेल, असेही चेतन मछले यांनी सांगितले.
फोटो जगदीश कोष्टी यांनी मेल केला आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. (छाया : केशव जाधव)